कर्जत : कर्जत तालुक्यातील सिद्धटेक ते करमाळा या ४५ किमी राज्य महामार्गासाठी आमदार रोहित पवार यांनी काही महिन्यांपूर्वी महाविकास आघाडी सरकारकडून २५३ कोटी रुपये मंजूर करून आणले होते. या महामार्गामुळे सिद्धटेक येथील सिद्धिविनायक, राशिन येथील जगदंबा माता व करमाळा येथील कमलादेवी ही जागृत धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत. सिद्धटेक ते करमाळा या ४५ किमी मार्गासाठी आशियायी विकास बँकेकडून १७९ कोटी तर राज्य सरकारकडून ७५ कोटी रुपये असे एकूण २५३ कोटी रुपये मंजूर करून आणण्यात आमदार रोहित पवार यांना यश आले.
दरम्यान, सिद्धटेक ते राशीन या २४ किमी रस्त्याच्या निविदा निघालेल्या असून त्या आशियायी विकास बँकेकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आल्या आहेत. त्याला लवकरच मंजुरी मिळेल. तसेच दोन ठिकाणी वन विभागातून रस्ता जात असल्याने वन विभागाच्या वतीने ना हरकत प्रमाणपत्र लागत असल्याने त्या संदर्भातील अर्ज हा संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला असून त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यास तात्काळ या रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल. त्यानंतर राशीन-चिलवडी ते करमाळा या उर्वरित मार्गासाठीच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू असून निविदा निघाल्यानंतर लगेच कामाला सुरुवात होणार आहे. यासोबतच कर्जत शहर ते खेडपर्यंत जो रस्ता यापूर्वी पूर्ण झाला आहे. त्याला पुढे कर्जत तालुका हद्द ते बारामतीपर्यंत रोहितदादांनी मंजूर करून त्यासाठी देखील 200 कोटींचा निधी टाकण्यात आला आहे. या माध्यमातून मतदारसंघातील नागरिकांना वाहतूक आणि दळणवळणासाठी मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे.
सिद्धटेक येथे अष्टविनायकापैकी एक सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे. संपूर्ण राज्यभरातून येथे भाविक येत असतात असेच राशीन येथील जगदंबा मंदिर व करमाळा येथील कमला देवीच्या दर्शनासाठी देखील भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. ही सर्व धार्मिक स्थळे सिद्धटेक ते करमाळा या रस्त्यामुळे जोडली जाणार असल्याने भाविक भक्तांची सोय तर होईलच शिवाय परिसरात दळणवळणाची सुविधा वाढून या भागाच्या विकासाला चालना मिळेल.
[read_also content=”केंद्राच्या निर्णयाविरोधात व्यापारी बांधवांनी पुकारलेल्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा : नाना पटोले https://www.navarashtra.com/maharashtra/congress-party-supports-the-agitation-called-by-the-businessmen-against-the-centres-decision-nana-patole-nrdm-305216.html”]
यासोबतच जामखेड-नान्नज-जवळा-करमाळा व कुळधरण-कर्जत-करमाळा या मतदारसंघातून जाणाऱ्या दोन्ही रस्त्यांच्या सर्वेक्षणाचे काम हे आशियायी विकास बँकेकडून सुरू असून ते आता अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या काही दिवसात त्याचा अहवाल बनवून लवकरच कामाला सुरुवात होईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.