अवघड वळणावर कारचं नियंत्रण सुटलं अन्..., माथेरान घाटात मारुती स्विफ्ट गाडीला अपघात
कर्जत: माथेरान येथे पर्यटनासाठी आलेल्या मुंबई कुर्ला येथील पर्यटकांच्या वाहनाला माथेरान घाटात अपघात झाला.हा अपघात जबरदस्त होता परंतु दैव बलवत्तर म्हणून चौघे प्रवासी वाचले आहेत.माथेरान घाटातील पिटकर पॉइंट येथे रस्त्याचा अंदाज न आल्याने चार प्रवासी प्रवास करीत असलेली मारुती स्विफ्ट कार थेट २५ फूट खाली रस्त्यावर कोसळली आणि आयोगात घडला.
मुंबई कुर्ला येथील चार प्रवासी आपली मारुती स्विफ्ट कार घेऊन माथेरान साठी आले होते.नेरळ माथेरान घाट रस्त्यात दुपारी प्रवास करीत असताना त्यांची कार पिटकर पॉइंट येथे असलेल्या वळणावर चढत होती.मात्र त्या वळणावर असलेला तीव्र चढाव लक्षात घेता चालकाने फिरवलेली गाडीची स्टिअरिंग त्या चालकाला पुन्हा सरळ करता आली नाही.त्यानंतर चार प्रवासी प्रवास करीत असलेल्या खासगी गाडी तब्बल २५ फूट खोल खालील रस्त्यावर येऊन आढळली.
हा अपघात इतका जबरदस्त होता की गाडीमध्ये कोणीही प्रवासी वाचले नसतील असे हा प्रवास पाहणारे यांना वाटत होते.अपघात स्थळी त्या गाडीच्या बाजूला रक्त सांडलेले दिसत असल्याने नेरळ माथेरान टॅक्सी संघटनेच्या चालकांनी धावपळ करीत त्या गाडी मध्ये अडकलेल्या सर्व चार प्रवाशांना बाहेर काढले.दुपारी दोन वाजण्याची आसपास ही घटना घडली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गाडी मधील जखमी प्रवासी यांना तत्काळ नेरळ येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी पाठवून दिले.डॉ शेवाळे यांच्या धन्वंतरी हॉस्पिटल मध्ये जखमी चारही प्रवासी यांच्यावर उपचार करण्यात आले असून एक प्रवासी गंभीर जखमी असून अन्य तीन प्रवासी यांना किरकोळ मार लागला आहे.
या अपघातात कुर्ला मुंबई येथील श्रीधर साळुंखे,सोहेल शेख,चेंबूर येथील आकाश गायकवाड आणि कुर्ला येथील अहमद खान हे जखमी त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.नेरळ पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून या सर्व प्रवासी पर्यटक यांचे दैव बलवत्तर म्हणून चौघे प्रवासी वाचले आहेत. वळणावरील रस्त्यावरून त्यांचे वाहन खालच्या रस्त्यावर कोसळून देखील जीवित हानी झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.माथेरान घाटातील या पिटकर पॉइंट वरील मागील एका महिन्यातील हा तिसरा अपघात आहे.