20th Tata Mumbai Marathon : प्रत्येक मैल धैर्याने पार करा; अंतिम लक्ष्य नक्की गाठाल; सर मो फराह यांचा खेळाडूंना सल्ला
मुंबई : प्रत्येक मैल धैर्याने पार करा. प्रत्येक टप्प्यावर लक्ष केंद्रित करून विश्वासाने पुढे जा. तुम्ही नक्की लक्ष्य गाठाल, असा सल्ला महान धावपटू आणि जगातील सर्वोत्तम ट्रॅक ॲथलीट सर मो फराह यांनी रविवार, 19 जानेवारी रोजी होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉनच्या 20 व्या आवृत्तीतील सहभागींना दिला. त्याने ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धांमध्ये 5 हजार आणि 10 हजार मीटर धावणे प्रकारात दुहेरी सुवर्णपदकाची नोंद केली. मॅरॅथॉनचा विचार करता 2018 शिकागो मॅरेथॉन जिंकल्यानंतर त्याच वर्षी लंडन मॅरेथॉनमध्ये कांस्यपदक जिंकले.
एकावेळी एकाच मैलाचा विचार करा
प्रत्येक मैल पार करा. मी सुद्धा अशाचप्रकारे एका वेळी एकाच मैलाचा विचार करून पार केला. हा मैल, नंतर पुढचा आणि नंतर पुढचा, असे मी नेहमी स्वतःला म्हणायचो. लंडन मॅरेथॉनमध्ये मी सुरुवातीपासूनच संघर्ष करत होतो. तो एक कठीण दिवस होता. पण 42 किलोमीटर जायचे आहे असाच विचार मी करत नव्हतो. प्रत्येक मैल पार करायचा विचार करत होतो. तसे करताना अव्वल तीन धावपटूंमध्ये स्थान मिळविले,” असे मो फराह यांनी टाटा मुंबई मॅरेथॉनच्या शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
परदेशी धावपटूंचा असणार सहभाग
389,524 अमेरिकन डॉलर बक्षीस रकमेच्या शर्यतीत जागतिक आणि देशांतर्गत सर्वोत्तम धावपटूंची एक प्रभावशाली फळी धावताना दिसेल. ज्यात इथिओपियाचे गतविजेते पुरुष आणि महिला चॅम्पियन हेले लेमी बेर्हानू आणि अबराश मिन्सेवो यांचा समावेश आहे. मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, 10 किमी खुला गट, सीनियर सिटीझन्स रन, चॅम्पियन्स विथ डिसॅबिलिटीज आणि ड्रीम रन या सहा वेगवेगळ्या श्रेणींमध्ये एकूण 63,000 स्पर्धकांचा विक्रमी सहभागही यंदाच्या मॅरॅथॉनमध्ये पाहायला मिळेल आणि त्यात फराहची उपस्थिती नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
आपल्या सर्वांचे मोठे होत असलेले रोल मॉडेल आहेत, मग ते पालक असोत किंवा क्रीडापटू. मी तरुणांना परत देऊ शकलो, तर त्यांना प्रेरणा देणारा एक सल्ला म्हणजे प्रवासाचा आनंद घ्या, चुका करण्याची तयारी ठेवा आणि त्यांच्याकडून शिकून घ्या. जर तुम्ही चुका केल्या नाहीत, तुम्ही कोणतीही रेस गमावली नाही, तर तुम्ही कसे शिकणार? तो प्रवास महत्त्वाचा आहे,” असे मो फराह म्हणाले.
टाटा मुंबई मॅरेथॉनच्या केंद्रस्थानी परोपकार आणि सामाजिक कल्याण आहे, ज्याने सुरुवातीपासून अनेक कारणांसाठी 400 कोटी रुपये जमा केले आहेत. ज्यामुळे लाखो लोकांच्या जीवनांवर सकारात्मक परिणाम झाला आहे. तरुण पिढ्यांसह धर्मादाय संस्थांना परत देण्याचा माझा मोठा विश्वास आहे. ज्या क्षेत्रांना पाठिंब्याची गरज आहे त्यांच्यासाठी आपण सर्वांनी आपले योगदान देणे महत्त्वाचे आहे,”