कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका (KDMC) क्षेत्रात २ खासदार आणि ४ आमदार आहेत. परंतु, १ आमदार आणि १ खासदार यांच्याच मतदारसंघात स्मार्ट सिटीची (Smart City) कामे सुरु असल्याचे मनसे आमदार राजू पाटील (MLA Raju Patil) यांनी सांगितले. ठाणे जिल्हा समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील (Thane Collector Office) नियोजन भवन येथे सुरु होती. यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी हा संताप केंद्रीय मंत्री कपिल पाटील (MP Kapil Patil) यांच्यासमोर व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्मार्ट सिटी या महत्वाकांक्षी योजनेत कल्याण-डोंबिवली महापालिकेचा समावेश करण्यात आला आहे. मात्र या योजनेतील विकास कामही एक आमदार आणि एक खासदार यांच्याच मतदारसंघात सुरु असल्याचे दिसून आले आहे. सध्या कल्याण-डोंबिवली परिसरात स्मार्ट सिटीच्या विकास कामांना वेग आल्याचे दिसून येत आहे. अन्य आमदारांच्या मतदारसंघांना वगळून एक आमदार आणि एक खासदार यांच्याच मतदारसंघात स्मार्ट सिटीची काम सुरू असल्याने मनसे आमदार राजू पाटील, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकाला सॅटीस स्मार्ट सिटी अंतर्गत बनवण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी केली होती. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
अमृत योजनेच्या कामाचा ऑडिट होणार !
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांमध्ये केंद्र शासनाच्या अमृत योजनेचे काम सुरू आहे. हे काम करत असताना ठेकेदाराने रस्ते खोदून जलवाहिन्या टाकल्या आहेत. त्यामुळे शासनाने तयार केलेल्या रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. रस्त्याची दुरुस्ती करून देणे या ठेकेदाराची जबाबदारी आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. तसेच, संबंधीत ठेकेदाराच्या कामाचा देखील ऑडिट करण्याची मागणी राजू पाटील यांनी बैठकीत केली आहे. त्यानुसार या कामाचा लवकरच स्ट्रक्चरल ऑडिट केल जाणार असल्याची माहिती केडीएमसीकडून देण्यात आली आहे. स्थानिक आमदारांना घेऊन सुरु असलेल्या अमृत योजनेच्या कामाचा दौरा करण्याच्या सूचना देखील केंद्रीय मंत्र्यांनी दिल्या आहेत.
लोकग्राम ब्रिजचे काम संथ गतीने !
कल्याण रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या लोकग्राम ब्रिजचे काम हे संथ गतीने सुरु आहे. या पुलाची उभारणीही रेल्वेकडून करण्यात येणार असून त्या संबंधी रक्कम कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून रेल्वेला सुपूर्द करण्यात आली आहे. मात्र या संदर्भात रेल्वेकडे पाठपुरावा केला जात नसल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. या नंतर तातडीने या संदर्भात महापालिका पाठपुरावा करेल असे आश्वासन आयुक्तांकडून देण्यात आले आहे. केडीएमसी, एमएमआरडीए आणि रेल्वे प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने हे काम संथ गतीने सुरु आहे.
दिव्याकडे लक्ष द्यायला हवे – कपिल पाटील
राजू पाटील यांनी दिव्यातील समस्यांचा पाढा केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या समोर मांडला. यामध्ये प्रामुख्याने दिवा डम्पिंग, भंडार्ली डम्पिंग, स्वच्छता गृह, वाहतूक कोंडी, अर्धवट पूल आधी समस्यांचा पाढा वाचला. या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून दिव्याकडे लक्ष द्यायला हवे असे सूचित देखील ठाणे मनपाच्या अधिकाऱ्यांना करून दिले आहे.