सीना नदीला आलेल्या महापुरामुळे रेल्वे सेवेला फटका; सोलापूर-कुर्डुवाडी, कुर्डुवाडी-बार्शी मार्ग काही काळ बंद
कुर्डुवाडी : मुसळधार पावसामुळे सीना नदीला आलेल्या महापुरामुळे नदीवरील पुलाला पाणी येऊन टेकले. त्यामुळे रस्ते वाहतुकीबरोबर रेल्वे वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती. तर काही रेल्वे गाड्या मार्ग बदलून पुढे पाठवण्यात आल्या. प्रवाशांची मात्र मोठी धांदल उडाली होती. याशिवाय, सोलापूर-कुर्डुवाडी, कुर्डुवाडी-बार्शी हा मार्ग काही काळ बंद करण्यात आला होता.
सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना महापूर आला आहे. त्याचाच प्रत्यय येथील सीना नदीला आला. सीना नदीचे पात्र वाढत सदर पाणी नदीवरील रेल्वे व रस्ते वाहतूक पूलाला येऊन टेकल्याने मंगळवारपासूनच कुर्डुवाडी-बार्शी रोडवरील रिधोरे येथील व सोलापुर-पुणे मार्गावरील सीना नदीवरील पूल रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यानंतर काही काळाने सदर पाणी धोका पातळी ओलांडून रेल्वे पूलालाही येऊन टेकला.
हेदेखील वाचा : Maharashtra Heavy rains: अतिवृष्टी, पूरस्थिती अन् मृत्यू…:मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्त्वाचे आदेश
यामुळे मंगळवारी रात्री अडीच वाजल्यापासून रेल्वे वाहतूक ही बंद करण्यात आली होती. त्यामुळे कुर्डुवाडी, बार्शी, सोलापुर, दौंड आदी स्थानकातच काही गाड्या थांबवण्यात आल्या. तब्बल पाच ते सहा तास गाड्यांना उशीर झाला. त्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. बार्शी-कुर्डुवाडी रेल्वे मार्ग मंगळवारी ८.४० च्या सुमारास बंद करून बुधवारी पहाटे ३.४० च्या सुमारास पुन्हा रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरळीत करण्यात आली.
सोलापूर-कुर्डुवाडी रेल्वेमार्ग बंदच होता. त्यामुळे सोलापूर मंडल रेल प्रबंधक सुजीत मिश्रा यांनी आपात्कालीन परिस्थितीचा अंदाज घेऊन बार्शी-कुर्डुवाडी रेल्वे मार्ग चालू होताच गदग एक्सप्रेस, हुसेनसागर, शताब्दी, मुंबई-चैन्नई, नागरकोइल आदी रेल्वे गाड्या लातूर, बिदर मार्गे वळविण्यात आल्या.
यावेळी सोलापूरला जाणाऱ्या प्रवाशांना कुर्डुवाडी रेल्वे स्थानकात उतरवून घेऊन सोलापूरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी बार्शी मार्गे सोलापूर एसटी बसची कुर्डुवाडी रेल्वे स्थानकातूनच सोय करण्यात आली होती. तसेच माढा येथे सात एसटी बस रेल्वेच्या खर्चाने सोडण्यात आल्या. यावेळी रेल्वे प्रवाशांच्या सोयी व सुरक्षेसाठी एसटी बसमध्ये प्रशासनाने रेल्वेचे तिकीट तपासणीसही दिले होते.
प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने मुख्य वाणिज्य निरीक्षक आनंद काळे, चीफ पार्सल सुपरवायझर धम्मदीप ओहोळ, चीफ गुड्स सुपरवायझर सुभाष मुळे यांनी प्रवाशांसाठी चहा, नाष्टा, केळी व पाण्याची सोय केली होती. दुपारी तीनच्या सुमारास सोलापूर-पुणे एकच अपलाईन धीम्या गतीने सुरु झाली. डाऊनलाईन दुपारपर्यंत बंदच होती. त्यामुळे काही गाड्या लातूरमार्गे वळवण्यात आल्या होत्या.