देव तारी त्याला...! दुचाकीवरून महिला पडली; मागून कार येत असतानाच अचानक ब्रेक दाबला अन्... (संग्रहित फोटो)
नागपूर : सीताबर्डी उड्डाणपुलाच्या रहाटे कॉलनीकडील उतारावर मोठा अपघात झाला. मात्र, वाहनचालकाने वेळीच ब्रेक दाबल्याने पुढील दुर्घटना टळली. पुलाच्या उतारावर असलेल्या खोल खड्ड्यामुळे दुचाकीवरून जात असलेल्या एका महिलेचा तोल गेला आणि ती रस्त्यावर पडली. मागून येणाऱ्या कारचालकाने प्रसंगावधान राखत महिलेला वाचवण्यासाठी तात्काळ ब्रेक लावला.
अचानक ब्रेक लागल्याने मागून येत असलेल्या रुग्णवाहिकेचा चालक गोंधळला आणि त्याने कारला धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र, कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. धंतोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिका जप्त केली. अपघातामुळे उड्डाणपुलावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी ४.४५ वाजताच्या सुमारास एक महिला दुचाकीवरून सीताबर्डी उड्डाणपुलावरून रहाटे कॉलनीकडे जात होती. पुलाच्या उतारावर एक मोठा खड्डा झाला.
महिलेची दुचाकी या खड्ड्यावरून घसरली आणि तिचा तोल गेला. ती दुचाकीसह खाली पडली. त्याच दरम्यान कार मागून येत होती. चालकाने महिलेला वाचविण्यासाठी तात्काळ ब्रेक लावला. कार वेळेत थांबल्याने महिलेचा जीव वाचला. मात्र, कारमागून एक रुग्णवाहिकाही येत होती. कार अचानक थांबल्याने रुग्णवाहिकेचा चालक गोंधळला आणि समजण्यापूर्वीच त्याने कारला मागून धडक दिली. कारमध्ये एक कुटुंब बसलेले होते, तर रुग्णवाहिकेत केवळ चालक होता. अपघातामुळे कारचे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.
रात्रीच्या वेळी वाढताहेत अपघात
रात्रीच्या वेळी दिसत नाही आणि त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांनी दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. यावरून संबंधित अधिकारी आणखी किती अपघातांची प्रतीक्षा करीत आहेत, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिक संतप्त
अपघातानंतर काही काळ पुलावर वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बराच वेळपर्यंत वाहतुकीचा खोळंबा झाला होता. एका खड्ड्यामुळे वाहनचालकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे असतानाही महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला हा खड्डा दिसत नाही का? असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.
हेदेखील वाचा : आनंदाचा उत्साह, दुःखाच्या किंचाळीत बदलला! झिपलाइन वायर तुटली अन् मनालीत 12 वर्षांची मुलगी 30 फुटाच्या दरीत कोसळली; Video Viral






