पावसाळ्यानंतर थेट उन्हाळा, नागरिकांना आरोग्याच्या वाढल्या समस्या
भंडारा : जुलै-सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस झाल्यानंतर पावसाने परतीची तयारी केली. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच ‘ऑक्टोबर हिट’चे तीव्र चटके जाणवू लागले आहेत. जुलैमध्ये हजेरी लावलेल्या पावसाने ऑगस्ट महिन्यात उसंत घेतली. मात्र, सप्टेंबरमध्ये कमी अधिक पाऊस झाला.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार आहे. शहरात ऑक्टोबर हिट जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून दिवसा व रात्रीही हवेत उष्णता जाणवत आहे. त्यामुळे उकाड्याने आता नागरिक हैराण होऊ लागले आहेत. ऑक्टोबर महिन्यात उन्हाच्या झळा असह्य होत आहेत. राज्यातील अनेक भागात ‘ऑक्टोबर हिट’ने अंगाची काहिली होत आहे. दरम्यान, पुढील 10 दिवस या झळा आणखी तीव्र होतील. त्यानंतर हळूहळू तापमानात घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात तापमान 33 ते 34 अंशावर पोहोचले आहे. तापमानात झपाट्याने वाढ होत असल्याने उकाडा आणि उन्हाच्या चटक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिवसा चटका आणि रात्री दमटपणा वाढत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मान्सून परतीच्या वाटेवर असून, हवामान कोरडे असल्याने उकाडा जाणवत आहे. दुपारचे तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअस नोंदवले जात आहे. त्यामुळे नागरिकांना घाम फुटत आहे. ऑक्टोबरमध्ये दक्षिण-पश्चिम मान्सूनचे वारे कमकुवत होतात आणि हळूहळू माघार घेऊ लागतात. पावसाळा संपून हिवाळ्याला सुरुवात होण्याचा हा काळ असतो. हा बदल होत असताना जो संक्रमणाचा काळ असतो, तो ऑक्टोबर महिन्यात येत असतो. या दिवसात पाऊस थांबलेला असतो. अशावेळी आकाशातून सूर्याची किरणे थेट जमिनीवर पडतात.
आजारांनी काढले डोके वर
पारा चढल्याने आणि उकाडा वाढल्याने नागरिक हैराण झाले आहे. याचबरोबर, सर्दी, ताप, खोकला आदी आजाराने डोके वर काढल्याने सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे सर्वत्र कडक उन्ह तापत आहे. सोबतच उकाडा जाणवत असून, नागरिक वाढलेल्या उकाड्याने हैराण झाले आहेत.