File Photo : Suicide News
चोपडा : टापयपिंगची परीक्षा देण्यासाठी मालेगाव येथे गेलेल्या एका तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. कुलदीप उर्फ भटू सुधाकर पाटील (वय 27, रा. चहार्डी, ता. चोपडा) असे या तरूणाचे नाव आहे. हा तरुण 19 जूनपासून बेपत्ता होता. त्याने मालेगाव येथे बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील कुलदीप हा मालेगाव येथे टायपिंगची परीक्षा देण्यासाठी गेला होता. पेपर दिल्यानंतर कुटुंबियांनी त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. त्याचा मोबाईल बंद असल्याने त्याचा शोध घेण्यात आला. या प्रकरणी मालेगाव कॅम्प पोलिस स्टेशनला बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली.
दरम्यान, छावणी पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत कामगारांना गळफास घेतलेल्या युवकाचा मृतदेह असल्याचे आढळून आले. पोलिसांना घटनास्थळी धाव घेतल्यानंतर मयताची ओळख पटवली.
कृषी विभागातून पदवीधर
कुलदीप हा उच्चशिक्षित होता. त्याने बारामती येथून कृषी पदवी घेतली होती. त्यानंतर तो स्पर्धा परीक्षा देत होता. त्यात त्याला यश देखील मिळत होते. यात तो राज्यसेवेची पूर्व परीक्षा पास होऊन मुख्य परीक्षेची तयारी करत होता. तर मालेगाव येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या टायपिंगची परीक्षा देण्यासाठी गेला होता.
आत्महत्येने सर्वत्र हळहळ
कुलदीपने आत्महत्या करून जीवन संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र, त्याने गळफास घेऊन आत्महत्या का केली यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही.






