अहमदनगर : न्याय मिळाला नाहीतर आम्ही पलटी मारतो, हे माझे विधान मागील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या राजकीय घडामोडींच्या संदर्भात होते. मात्र, याचा विपर्यास करुन, वेगळे अर्थ काढले गेले असल्याचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षामध्ये चांगले काम करण्याची संधी मिळाली असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
श्रीगोंदा येथे एका कार्यक्रमात बोलताना डॉ. विखे-पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा माध्यमांमधून विपर्यास केला गेला होता. याबाबत त्यांनी स्वत:च एका पत्रकाव्दारे खुलासा करुन, यासर्व चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळविताना ज्या पध्दतीने अन्याय झाला हे आपण सांगत होतो. परंतु, त्या वक्तव्याचा विपर्यास करुन, माध्यमांनी चुकीचा अर्थ काढला असल्याचे ते म्हणाले.
तसेच ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षामध्ये चांगले काम करण्याची संधी मिळाली असून, केंद्र सरकारच्या योजनांची सामान्य माणसासाठी यशस्वी अंमलबजावणी करण्याचे काम आपण करीत आहोत. यामध्ये आपण समाधानी असल्याचे डॉ.विखे-पाटील म्हणाले.