
Baramati Politics, Sunetra Pawar, Ajit Pawar Legacy, Baramati Hospital,
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये काही प्रमाणात मरगळ आल्याचे चित्र आहे. अजित दादांच्या निधनामुळे बारामतीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सर्वच क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी हाती घेतल्यापासून सुनेत्रा पवार यांनी बारामतीच्या विकासाचा वेग कमी होऊ देणार नसल्याची ग्वाही दिली आहे. पतीच्या निधनाचे मोठे असतानाही त्यांनी स्वतःला सावरत अजितदादादांप्रमाणे बारामती मध्ये आल्यानंतर जनता दरबार सुरू केला आहे. त्यांचे चिरंजीव जय पवार हेदेखील आठवड्यातून एक दिवस जनता दरबार घेत आहेत.
दरम्यान रविवारी (दि ८) सुनेत्रा पवार यांनी बारामती शहरातील विविध विकास कामांना भेटी देऊन कामाची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांना अनेक ठिकाणी अस्वच्छता आढळली. तसेच टाकाऊ औषधे दर्शनी भागात आढळून आले, यावेळी उपस्थित महिला कर्मचाऱ्यांना त्यांनी चांगलेच फैलावर घेतले. उपस्थितांची त्यांनी कान उघडणी केली, हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर, बारामतीकरांसह राज्यातील जनतेने त्यांच्या या आक्रमक भूमिकेचे स्वागत केले आहे. अजितदादा गेल्यानंतर, बारामती शहरातील विविध ठिकाणी अस्वच्छता वाढू लागली आहे.
बारामती बस स्थानकात देखील नियमित स्वच्छता होत नसल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर शहरांमध्ये गुन्हेगारी वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संबंधित वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे आदेश द्यावेत, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
अजित दादांनी मंजूर करून आणलेले विविध प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्याची आवश्यकता आहे. बारामती शहरामध्ये आणखी नवीन उद्योग घेण्यासंदर्भात, वरिष्ठ पातळीवर उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान त्यांचे मोठे चिरंजीव खासदार पार्थ पवार हे देखील स्वतः बारामती शहर व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. बारामतीची पूर्वीप्रमाणे उलाढाल वाढण्यासंदर्भात बारामती औद्योगिक वसाहतीमध्ये आणखी मोठा प्रकल्प आणण्याची आवश्यकता असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यापुढे बारामतीचा विकासाचा वेग कायम सुरू ठेवण्याचे मोठे आव्हान असले तरी, आक्रमक पद्धतीने काम करून शहर व तालुक्यातील गटातटातील राजकारणावरही लक्ष ठेवण्याची अपेक्षा कार्यकर्त्यांची आहे.