वसई: वसई विरारमध्ये (Vasai Virar) कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. दोन कोटींची खंडणी (Ransom) मागत गुंडांनी एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर दिवसाढवळ्या तलवारीने हल्ला ( Vasai Sword Attack)झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस ठाण्यात एनसी दाखल केल्यानंतर गुंडांनी दिवसाढवळ्या हल्ला केल्याची ही एका आठवड्यातील दुसरी घटना आहे.(Crime News)
वसईच्या एका बांधकाम व्यावसायिकाकडे दोन कोटीची खंडणी मागणाऱ्या गुंडानी त्या व्यावसायिकाने पोलीस ठाण्यात तक्रार देताच दुसऱ्या दिवशी तलवारीने हल्ला केला. ही घटना नायगांवच्या जुचंद्र येथे घडली आहे. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी (Naigaon Police Station) गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. गुंडांच्या दहशतीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यात दोन जण जखमी झाले आहेत.
घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
नायगाव येथील जूचंद्र येथे 21 जून रोजीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. खुलेआम तलवारीने दहशत निर्माण करण्याचा गुंडांचा प्रयत्न होता. जुचंद्र येथे बांधकाम व्यावसायिक जितेंद्र यादव यांचा बिंधशक्ती रियल इस्टेट अँड इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड नावाचं ऑफिस आहे. आरोपी गिरीश नायर याने 19 जूनला जितेंद्र यादव यांना फोन केला. त्यानंतर जमिनीसंदर्भात भेटायचं असल्याचं सांगून भेट घेतली आणि दोन कोटींची खंडणी मागितली.
काय झालं नुकसान?
दुसऱ्या दिवशी गिरीश नायरचे तीन गुंड आले आणि त्यांना जमिनीचे लिटिगेशन दूर करायचं असेल तर शेटला एक कोटी उद्या पाठवा नाहीतर तुझ्या ऑफीसमध्ये तुला आणि तुझ्या स्टाफला ठार मारेन अशी धमकी दिली. त्यानंतर सायंकाळी जितेंद्र यादव यांनी याबाबतची तक्रार नायगांव पोलीस ठाण्यात दिली. मात्र नायगांव पोलिसांनी याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. गिरीश यादव आणि त्याच्या 10 गुंडांनी दुसऱ्या दिवशी तलवारी आणि लोखंडी रॉडने थेट जितेंद्र यादवच्या कार्यालयावर हल्ला चढवला. जितेंद्र यादव यांच्या दोन गाड्या फोडल्या, अंकुश भुवड आणि जितेंद्र यादववर तलवारीने वार केले. दोन्ही गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलं आहे. अंकुश भुवड यांच्या डोक्यावर तलवारीनचे वार लागलेत. तसचे जितेंद्र यादव यांच्या पायावर वार करण्यात आलाय.
नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याबाबत जितेंद्र यादव यांनी नायगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन आरोपी गिरीष नायर, अहमद शेख, रियास शेख, फिरोज शेख, निलेश कांबळे, मोईद्दिन उर्फ मनी शेख, तेज उर्फ टिप्पा सोनावणे, विशाल चव्हाण, डी उर्फ जनक, रुपेश शिंदे आणि प्रथमेश दळवी या अकरा जणांवर गुन्हा दाखल केलाय. आरोपी गिरीश याचे फोटो नितेश राणे यांच्या सोबत आहेत. मात्र अद्याप पोलिसांनी कुणालाही अटक केलेलं नाही.