छत्रपती संभाजीनगर : ‘हिट अँड रन’ कायद्याविरोधात टँकरचालक पुन्हा संपावर जाणार असल्याची अफवा सोशल मीडियाद्वारे पसरल्याने सोमवारी दुपारनंतर शहरातील पंपांवर वाहनधारकांची एकच गर्दी उसळली होती. तर सायंकाळपर्यंत शहरातील अनेक पंप बंद झाले होते. शहरात इंधन टंचाई जाणवणार नाही, संप वगैरे काही नाही, असे स्पष्टीकरण पुरवठा अधिकारी, डिलर्स असोसिएशनच्या वतीने देण्यात आले. परिणामी, मंगळवारी सकाळपासून पंपावरील परिस्थिती ‘ऑल इज वेल’ असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
रिक्षा चालक, मालक संघटनेसह खासगी प्रवासी व माल वाहतूक करणाऱ्या विविध वाहनचालकांनी ९ जानेवारीपासून बेमुदत संपाची हाक दिली. ९ जानेवारी रोजी रात्री १२ वाजेपासून संप सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सलीम खामगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचे मेसेज सोशल मीडियावरून व्हायरल झाले आणि पुन्हा संप होणार असल्याचे पेट्रोल मिळणार नाही, अशी अफवा पसरली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.
वाहनधारक इंधन भरण्यासाठी पंपावर धडकले. परिणामी, अनेक पंपावर संध्याकाळपर्यंत ड्राय झाले. तर वाढलेली गर्दी, होणारे वाद टाळण्यासाठी अनेक डिलर्सनी इंधन विक्री बंद केली. मंगळवारी सकाळपासून मात्र सर्व परिस्थिती सुरळीत असल्याचे दिसून आले. शहरातील पंपावर तुरळक गर्दी दिसून आली.
वाहतूक सेनेचा निर्धार
महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने बुधवारी (दि.१०) सकाळी ११:३० वाजता बाबा पेट्रोलपंप येथून मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा मध्यवर्ती बसस्थानक, भडकल गेटमार्गे विभागीय आयुक्तालयावर जाईल. या मोर्चात वाहन चालक, मालक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष सलीम खामगावकर यांनी केले आहे.