मुंबई- ३० जानेवारी रोजी विधान परिषदेच्या (MLC Election) शिक्षक आणि पदवीधार पाच जागांसाठी चुरशीच लढत होणार आहे. काल उमेदवारी अर्ज (Application) दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र, 16 जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख झाल्यानंतरच रिंगणात कोण उमेदवार आहेत, ते स्पष्ट होईल. कारण अनेक मतदारसंघात पक्षाचे अधिकृत अ आणि ब फॉर्म (Form) मिळाले नसतानाही काही उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्जाची छाननी १३ जानेवारी २०२३ होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – १६ जानेवारी २०२३ आहे. मतदान – ३० जानेवारी २०२३ (सकाळी ८.०० ते दुपारी ४.००) होणार तर, मतमोजणी (Result) – २ फेब्रुवारी २०२३ होणार आहे. शेवटच्या दिवसांपर्यंत ११८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून सर्वाधिक म्हणजे ३४ अर्ज हे अमरावती पदवीधर मतदारसंघात दाखल झाले आहेत. नाशिक आणि अमरावतीमध्ये पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. तर, औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणूक होणार आहे.
विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारी अर्ज
कसा असतो निवडणुकीचा कालावधी?
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका दर सहा वर्षांनी होतात. या निवडणुकांसाठी नोंदणीकृत शिक्षक आणि पदवीधर मतदार मतदान करतात. यासाठी पात्र शिक्षक तसेच पदवीधरांना प्रत्येकवेळी नव्याने नोंदणी करणे आवश्यक असते. पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या मतदारांनी निवडणुकीच्या आधी मतदार म्हणून नोंदणी करायची असते. त्यानंतर ते या निवडणुकीत मतदान करू शकतात.
विधान परिषदेचे 3 शिक्षक मतदारसंघ आणि 2 पदवीधर मतदारसंघांत निवडणूक होणार आहे. ते खालीलप्रमाणे…
पाच ठिकाणी कोण-कोण उमेदवार उभे आहेत?
अमरावतीमध्ये रंतगदार लढत
अमरवती पदवीधर मतदारसंघही महाविकास आघाडीकडून काँग्रेसला उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे काँग्रेसचे उमेदवार धिरज लिंगाडे यांच्याविरोधात युतीतील डॉ.रणजित पाटील लढणार आहे.
नाशिकमध्ये एकतर्फी लढत
विधान परिषदेच्या या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि युती अशी थेट दुहेरी लढत पाहायला मिळणार आहे. नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने डॉ.सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, तांबेंनी आपली उमेदवारी मागे घेत सुपूत्र सत्यजित तांबे यांना उमेदवारी दिली. पंरतु, तांत्रिक घोळ झाल्याने सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे.
नागपूरमध्ये काय आहे चित्र?
नागपूर शिक्षक मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. मात्र, काँग्रेसने ही जागा सोडून शिवसेनेला दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंच्या गटातर्फे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे गंगाधर नाकाडे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर, भाजपाकडून महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे नागो गाणार यांना पाठिंबा देण्यात येणार आहे.
औरंगाबादेत कोणाचा विजय?
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. राष्ट्रवादीकडून विक्रम काळे रिंगणात उतरले असून भाजपाकडून किरण पाटील यांना उमेदवारी देण्यात आले आहे.
कोकणात काय होणार?
कोकण शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शेकाप उमेदवार बाळाराम पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. तर, भाजपाने ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे.
अशी असते निवडणूक प्रक्रिया…
पहिल्या पसंतीची मतं कोट्याएवढी नसल्यास दुसऱ्या पसंतीची मतं जो पूर्ण करील तो उमेदवार विजयी होईल. निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणत्याही पसंतीचा उमेदवार विजयी होऊ शकतो. यात कोणाचेही मतदान वाया जात नाही. विधानसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेत थेट निवडणूक प्रकिया होत नाही. इथे राष्ट्रपती, सिनेटसारख्या निवडणुकीतील पसंतीक्रमाची पद्धत वापरली जाते. संबंधित मतदारसंघाची मतदारसंख्या आणि उमेदवार यांच्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करते. निर्धारित कोट्याएवढी प्रथम क्रमांकांची मतं मिळवणारा उमेदवार विजयी होतो.
घटना काय सांगते…
सध्या महाराष्ट्र विधान परिषदेत 78 इतकी सदस्य संख्या आहे. घटनेच्या कलम क्र. 171/2 नुसार विधानपरिषदेच्या रचनेबाबद कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. विधानपरिषदेतील सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेले सदस्य नसतात. विधानपरिषदेत साधारणपणे पाच षष्टमांश सदस्य निर्वाचित असतात तर एक षष्टमांश सदस्य राज्यपाल नियुक्त असतात. 1956 च्या 7 व्या घटनादुरूस्तीनुसार असे निश्चित करण्यात आले आहे की, विधानपरिषदेची सदस्य संख्या तेथील विधानसभेच्या सदस्य संख्येच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त नसावी आणि 40 पेक्षा कमी नसावी.