राज्यात उन्हाचा कडाका वाढला; अकोल्यात तापमानाचा पारा 43.5 अंशांवर तर मुंबईत... (File Photo : Temperature)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला तर काही ठिकाणी उष्णतेने अक्षरश: कहर केला. त्यात आता राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये 40 अंश सेल्सिअसच्यावर तापमानाची नोंद झाली आहे. दुसरीकडे, मुंबईत कमाल तापमान 33.8 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. उष्णतेचा इशारा असूनही मुंबईत तापमान तुलनेने कमी होते.
मार्च महिन्यापेक्षा तापमानात घट झाली आहेच, पण सध्याची घसरण अशा वेळी झाली आहे जेव्हा महाराष्ट्र आणि देशाच्या बहुतेक भागात उष्णतेची लाट आली आहे. गुरुवारी महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान अकोला येथे नोंदवले गेले, जिथे कमाल तापमान 43.5 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले.
मुंबईतील तापमान आणखी कमी होणार
पुढील २-३ दिवसांत मुंबईतील तापमान आणखी कमी होईल, त्यानंतर उष्णतेची पातळी झपाट्याने वाढेल, असा अंदाज आहे. रविवारपर्यंत कमाल तापमान ३२-३३ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे, परंतु पुढील आठवड्यानंतर म्हणजेच मंगळवारनंतर ते ३६ अंशांपेक्षा जास्त होईल, असे आयएमडीने आपल्या अंदाजात म्हटले आहे.
मुंबई, कोकणात तापमानात घट होण्याचे कारण काय ?
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान ३३.८ अंश सेल्सिअस, तर कुलाबा वेधशाळेत ३४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. उर्वरित महाराष्ट्रासारखे कोकण-गोवा पट्टयात गेल्या काही दिवसांत सामान्यपेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले नाही. नोंदींनुसार, गुरुवारी कोकणातील रत्नागिरी वेधशाळेत ३२.२ अंश सेल्सिअस, पणजीत ३४.९ अंश सेल्सिअस आणि डहाणूत ३६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
उर्वरित महाराष्ट्र का उष्ण?
अरबी समुद्रावर प्रतिचक्रीवादळ प्रणालीमुळे महिन्याच्या सुरुवातीला शहरात उष्ण आणि दमट हवामान होते. आता ही प्रतिचक्रीवादळ प्रणाली पश्चिम किनाऱ्यापासून दूर गेली आहे. शिवाय सकाळच्या वेळी समुद्री वारे वाहत आहेत. त्यामुळे तापमानात घट झाली आहे, असे आयएमडी मुंबईच्या संचालक शुभांगी भुते यांनी सांगितले.