अहमदनगरमधील 120 किलोमीटर रेल्वे मार्गाची चाचणी यशस्वी
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या नगर बीड परळी रेल्वे मार्ग प्रकल्पाची शुक्रवारी 9 ऑगस्ट रोजी चाचणी घेण्यात आली होती. ही चाचणी यशस्वी झाली आहे. नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग प्रकल्पांतर्गत अंमळनेर ते विघनवाडी 30 किलोमीटर अंतराची ताशी 120 किमी वेगाने शुक्रवारी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली आहे. तसेच नगर ते बीडपर्यंत लोहमार्गचे काम देखील लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांचा प्रवास आता सोपा आणि सुखकर होणार आहे. आता अखेर मराठवाड्यातील प्रवाशांची प्रतीक्षा आता संपणार आहे.
हेदेखील वाचा- सोमवारी अहमदनगरमध्ये मनोज जरांगेंची शांतता रॅली, शाळांना सुट्टी जाहीर
या सर्व लोहमार्गामध्ये डिझेल इंजिनचा वापर करण्यात आला आहे. गेल्या सात वर्षांपासून या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. यापूर्वी नगर ते नारायणडोह, नारायणडोहा ते सोलापूर वाडी, सोलापूर वाडी ते आष्टी, आष्टी ते अंमळनेर या मार्गाची चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर आता अंमळनेर ते विघनवाडी 30 किलोमीटर अंतराची चाचणी घेण्यात आली आहे. शुक्रवारी 9 ऑगस्ट रोजी ताशी 120 किमी वेगाने रेल्वे मार्गाची चाचणी यशस्वीरित्या घेण्यात आली, अशी माहिती उप मुख्य अभियंता बांधकाम राकेश कुमार यादव यांनी दिली. शुक्रवारी झालेल्या चाचणीमध्ये या रेल्वे लोहमार्गाचा नेमका वेग काढण्यात आला. विघनवाडी ते परळी पर्यंतचा टप्पा पूर्ण होण्यास अजून एका वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्रशासकीय अधिकारी ए के पांडे, मुख्य अभियंता राजकुमार वानखेडे, उप मुख्य अभियंता राकेश कुमार यादव, सहाय्यक कार्यकारी अभियंता एस सुरेश, कार्यकारी अभियंता अवधेश मीना, सीनियर सेक्शन इंजिनिअर विद्याधर धांडोरे, सिनियर सेक्शन इंजिनिअर सत्येंद्र रा.कुवर, सिनियर सेक्शन संजय श्रीवास्तव, एक्झिकेटीव इंजिनिअर या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अमळनेर ते विघनवाडी लोहमार्गाची चाचणी घेण्यात आली.
हेदेखील वाचा- नंदीग्राम एक्सप्रेसच्या स्वच्छतागृहात एकाची गळफास घेऊन आत्महत्या; दादर रेल्वे स्टेशनवरील घटना
महत्त्वाचे म्हणजे या महत्त्वकांक्षी रेल्वे मार्गामध्ये अनेक मोठे पूल बांधण्यात आले आहेत. त्यासाठी मोठे तांत्रिक कौशल्य वापरून दक्षिण रेल्वे वरील सर्वात मोठा गल्डर टाकून रेल्वे रूळ अंथरण्यात आले आहेत. 500 मीटर लांबीचे व 18 मीटर उंचीचे नऊ मोठे पूल बांधण्यात आले आहेत. नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे आता रेल्वे गाड्या धावण्यासाठी लोहमार्गाला बळकटी मिळणार आहे.
अहमदनगर-बीड-परळी नवीन रेल्वे मार्ग हा सर्वोच्च प्राधान्याने राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांपैकी एक आहे. सर्वात महत्त्वाच्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांपैकी एक असलेला हा प्रकल्प आहे. हा महत्त्वाचा रेल्वे मार्ग 261.25 किलोमीटर लांबीचा आहे. त्यापैकी अहमदनगर ते अमळनेर हा 100.18 किलोमीटरचा भाग पूर्ण झाला आहे आणि पुढील टप्पा अमळनेर ते एगनवाडी हा 33.12 किलोमीटरचा आहे. लवकरच नगर ते बीडपर्यंत लोहमार्गचे काम पूर्ण होणार असून मराठवाड्यातील प्रवाशांचा प्रवास सोपा आणि सुखकर होणार आहे.