जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप पर्यटकांवर अतिरेकी हल्ला झाल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर नेरळमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
नेरळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीने निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना कर्जत पंचायत समितीच्या माजी सभापती आणि शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या सुजाता मनवे यांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. “हल्लेखोर पाकिस्तानात किंवा पाताळात लपले असले, तरी त्यांना शोधून काढून कठोर शिक्षा व्हावी,” अशी मागणी त्यांनी केली.
शिवसेना ठाकरे गटाचे नेरळ शहरप्रमुख बंडू क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करत केंद्र सरकारने आता अधिक कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. “देशाच्या सीमेवर सतत घडणाऱ्या अतिरेकी हल्ल्यांनी देशातील निष्पाप नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. अशा भ्याड हल्ल्यांमुळे देशाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. हे थांबवायचे असल्यास केंद्र सरकारने केवळ निवेदनं न देता, तातडीने कडक कारवाई केली पाहिजे,” असे ते म्हणाले. तसेच त्यांनी पुढे सांगितले की, “अतिरेक्यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या बिळातून ओढून काढावं आणि त्यांच्यावर गोळ्या झाडून ठार मारावं. ही वेळ केवळ निषेध करण्याची नाही, तर थेट कारवाई करून अशा प्रवृत्तींचा कायमचा नायनाट करण्याची आहे. याशिवाय, पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कर पाठवून तिथे अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात यावेत, जेणेकरून पुन्हा अशी हिंसक घटना घडणार नाही.” त्यांच्या या आक्रमक भाषणाला नागरिकांनी आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिला. त्यांच्या मतानुसार, देशाच्या एकात्मतेसाठी आता निर्णायक पावले उचलण्याची वेळ आली आहे.
या निषेध आंदोलनात उप तालुका संघटक सुधाकर देसाई, उप तालुका प्रमुख सुरेश गोमारे, माजी उप तालुका प्रमुख शशिकांत मोहिते, विभागप्रमुख अल्पेश मनवे, नेरळ शहराचे उपप्रमुख चींधू बाबरे, संतोष सारंग, युवासेना पदाधिकारी राहुल भाटकर, रमेश पवार, माजी शहर प्रमुख भाऊ क्षीरसागर, ग्रामपंचायत माजी सदस्य सुरेश भवारे, जेष्ठ शिवसैनिक सतीश ठाकरे, संजय कांबळे तसेच महिला आघाडीच्या कल्पना चव्हाण, प्राची मनवे, रश्मीला शेलार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचे प्राण गेले असून, अशा प्रकारच्या घटनांनी देशातील शांतता व एकात्मतेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न अतिरेकी करत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने कठोर पावले उचलून देशाच्या सुरक्षेसाठी ठोस कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.