नाशिक : नगरसेवक पदावर असतानाही महापालिकेचा ठेका घेऊन आर्थिक फसवणूक केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल असलेले ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या अंतरिम जामिनावर आज (दि.17) सुनावणी होणार आहे. गेल्या मंगळवारच्या (दि.9) सुनावणीत बडगुजर न्यायालयात गैरहजर असल्यामुळे 17 जानेवारीच्या सुनावणी दरम्यान बडगुजर व त्यांच्या साथीदारांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
गेल्या महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सुधाकर बडगुजर, साहेबराव शिंदे, सुरेश चव्हाण यांच्या विरोधात सरकारवाडा पोलिसांत भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. बडगुजर हे महापालिकेत नगरसेवक असताना पदाचा दुरूपयोग करून त्यांनी त्यांच्या मे. बडगुजर अँड कंपनीला महापालिकेच्या कामाचा ठेका देण्याबाबत शिफारस केल्याचा ठपका एसीबीने ठेवून हा गुन्हा दाखल केला. सुनावणीला अनुपस्थिती या गुन्ह्याने राजकीय खळबळ उडाली होती. सदरचा गुन्हा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोपही करण्यात आला होता.
दरम्यान, या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी बडगुजर यांनी विशेष न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असता, न्यायालयाने 9 जानेवारीपर्यंत बडगुजर यांना अटक न करण्याचे आदेश एसीबीला दिले होते. त्यानुसार मंगळवारी (दि.9) बडगुजर यांच्या अर्जावर अंतिम सुनावणी ठेवण्यात आलेली असताना बडगुजर व त्यांचे साथीदार सुनावणीसाठी उपस्थित नसल्याची बाब सरकारी वकील पंकज चंद्रकोर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.