'माझे घर, माझा गणपती' संकल्पनेतून ठाणे महापालिकेची शाडू मूर्ती कार्यशाळा, ३००० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
ठाणे महानगरपालिका पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘माझे घर, माझा गणपती’ या संकल्पनेअंतर्गत शहरातील विविध ठिकाणी शाडू मातीपासून गणेशमूर्ती घडविण्याच्या कार्यशाळांचे आयोजन करत आहे. या उपक्रमाला पर्यावरण दक्षता मंडळ व इतर सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभले आहे. नागरिकांसाठी या कार्यशाळा पूर्णपणे विनामूल्य असून, सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे.
दि. १४ जूनपासून दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे सुरू झालेल्या ग्रीन शॉपी कार्यालयातील कार्यशाळेत आतापर्यंत १०० हून अधिक नागरिकांनी शाडू मातीच्या मूर्ती तयार केल्या आहेत. अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, यासाठी कार्यशाळांची ठिकाणे व संख्याही वाढविण्यात येत आहे, अशी माहिती ठाणे महानगरपालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली.
दादोजी कोंडदेव स्टेडियम, गाळा क्र. १५ – येथे १७ ऑगस्टपर्यंत दररोज कार्यशाळा आयोजित केली जात आहे.
उपवन तलाव ॲम्फी थिएटर – येथे १७ ऑगस्टपर्यंत दर शनिवार आणि रविवार कार्यशाळा होईल.
शिवशाहूफुलेआंबेडकर स्मृती सभागृह, पोखरण रोड नं. २ – येथे २ व ३ ऑगस्ट रोजी कार्यशाळा आयोजित.
या कार्यशाळांमध्ये सहभागी होण्यासाठी ९९२०७७२८६९ या क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदवता येईल.
महानगरपालिकेच्या ‘पर्यावरण शाळा’ उपक्रमांतर्गत विविध शाळांमध्ये शाडू मातीच्या मूर्ती घडविण्याचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमात ठाणे महापालिकेच्या हद्दीतील ३००० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक सण साजरा करण्याबाबत मार्गदर्शन आणि जनजागृतीही करण्यात आली. ठाणे शहरासह डायघर, खर्डी, दिवा, मुंब्रा, बाळकुम, मानपाडा, ओवळा परिसरातील शाळांनी या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला.
महानगरपालिकेने ४ मूर्तीकारांना विनामूल्य जागा उपलब्ध करून दिली आहे. तसेच, १७ मूर्तीकारांना सुमारे २५ टन शाडू माती विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे मूर्तीकारांना आर्थिक दिलासा मिळत असून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यास प्रोत्साहन मिळत आहे.
या उपक्रमाद्वारे ठाणे महापालिकेचा उद्देश नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देत सुरक्षित आणि हरित गणेशोत्सव साजरा करण्याकडे वाटचाल करण्याचा आहे.