ठाण्यात नोकरी देण्याच्या नावाखाली तरुणांची फसवणूक, आमदार संजय केळकरांकडे तक्रार अन् पुढे...
प्लेसमेंट सर्व्हिसेस कंपनीने नोकरी देण्याच्या नावाखाली सेवा शुल्क घेऊन फसवणूक केलेल्या बेरोजगार तरुणांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रार करताच त्यांनी तत्काळ फोन करून संबंधित कंपनीच्या संचालकाला फैलावर घेतले. विशेष म्हणजे अवघ्या 20 मिनिटांत या तरुणांच्या खात्यात त्यांचे पैसे जमा झाले. यापुढे पोलिसांना तक्रारी न करता स्टेशन परिसरातील अशा प्लेसमेंट कंपन्यांना पक्ष कार्यकर्त्यांना घेऊन सील ठोकणार असल्याचे केळकर म्हणाले.
भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आज झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात फसगत झालेले बेरोजगार तरुणांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेत व्यथा मांडली. यावेळी ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील शिवप्रेरणा एका प्लेसमेंट सर्व्हिस कंपनीने सेवा शुल्क घेऊन नोकरीही दिली नाही आणि मागणी केल्यानंतर सेवा शुल्कही परत केले नाही, अशी तक्रार या तरुणांनी केल्यानंतर केळकर यांनी तत्काळ संबंधित फर्मच्या संचालकांना फोन लावून फैलावर घेतले. त्यानंतर २० मिनिटांत या तरुणांच्या बँक खात्यात ऑनलाईन पैसे जमा झाले. पैसे मिळाल्याने या तरुणांनी आभार मानले. यावेळी आमदार निरंजन डावखरे, अनिल भगत, दीपक जाधव, सूरज दळवी, जितेंद्र मढवी, मेघनाथ घरत, सुरेश कांबळे, मंगेश नईबागकर, तन्मय भोईर आदी उपस्थित होते.
याबाबत बोलताना केळकर म्हणाले, स्टेशन परिसरात आणि इतर ठिकाणी अनेक प्लेसमेंट फर्म्स असून तरुणांना रोजगार देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक होत असते. यात फसवणूक झालेल्या अनेक तरुणांना आम्ही त्यांचे पैसे परत मिळवून दिले आहेत. पण तरुणांनी देखील पैसे भरण्याआधी चौकशी करावी, असे आवाहन केळकर यांनी केले. अशा प्रकरणाबाबत पोलिसांकडे तक्रारी करूनही या फर्म्स चालूच आहेत. त्यामुळे आता तक्रारी न करता थेट कार्यकर्त्यांना घेऊन या प्लेसमेंट कार्यालयांना सील ठोकू, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी काम करूनही मोबदला न मिळालेल्या कर्मचाऱ्याने देखील व्यथा मांडली. कंत्राटदाराने काम करून घेतले, पण मोबदला देण्यास टाळाटाळ करत असल्याची या कर्मचाऱ्याने तक्रार करताच केळकर यांनी संबंधित कंत्राटदाराला फोन करून चांगलेच खडसावले. अखेर दोन दिवसात कर्मचाऱ्याचे पैसे देण्याचे कंत्राटदाराने कबुल केल्याने संबंधित कर्मचाऱ्याने सुटकेचा निःश्वास टाकला.
मुंब्रा रेतीबंदर विसर्जन घाटावर हनुमंताची प्राचीन मूर्ती सापडली. ती सुरक्षितपणे झाडाखाली ठेवण्यात आली होती. मात्र एका तक्रारीनंतर महापालिका प्रशासनाने ती हलवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी ती भंग पावली. ग्रामदैवत मंदिरासाठी योग्य जागा देऊन या ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याबाबत महापालिकेने सहकार्य करावे, अन्यथा सकल हिंदू समाज कळवा-मुंब्रा यांच्यावतीने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा केळकर यांनी दिला आहे.