ठाण्यातील शास्त्रीनगर मध्ये अनधिकृत गाळे आणि चाळ बांधणी सुरूच, एकनाथ शिंदे यांच्या आदेशाची पायमल्ली
ठाणे शहरातील शास्त्रीनगर परिसरात ठाणे महापालिकेचे महत्त्वाचे मोकळे भूखंड अनधिकृत गाळे व चाळी उभारून भूमाफियांनी गिळंकृत करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करून भूखंड मोकळे करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र, महापालिकेच्या अतिक्रमण व निष्कासन विभागाने या आदेशाकडे पूर्णतः दुर्लक्ष करत भूमाफियांना मोकळे रान दिल्याचा आरोप स्थानिक माजी नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी केला आहे.
ठाण्यातील शास्त्रीनगरमधील हे भूखंड महत्त्वाच्या ठिकाणी असून त्यावर जेष्ठ नागरिक कट्टा, आरोग्य केंद्र, तसेच डीपी रोडचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी आवश्यक वर्क ऑर्डरही जारी झालेली आहे. तरीदेखील, महापालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने भूमाफियांनी अनधिकृत गाळे व चाळी बांधण्याचे काम सुरू केले. विशेषतः मोठ्या नाल्यालगत ही बांधकामे सुरू असून भविष्यात दुर्घटना घडण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
या परिस्थितीविरोधात स्थानिक नागरिक आणि हणमंत जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी नोव्हेंबर 2024 मध्ये लोकमान्य नगर – सावरकर नगर प्रभाग समितीवर मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करण्यात आली. त्यांनीही दूरध्वनीवरून ठाणे महापालिका प्रशासनाला अतिक्रमण निष्कासित करण्याचे आदेश दिले होते. परंतु अतिक्रमण आणि निष्कासन विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे व इतर संबंधित अधिकाऱ्यांनी हे आदेश पायदळी तुडवत कारवाई टाळली आहे.
नातेपुते येथे माऊलींच्या पालखीचे परतीच्या प्रवासात उत्साहात स्वागत; परिसर बनला भक्तिमय
हणमंत जगदाळे यांनी पालिका प्रशासनावर घणाघात करत सांगितले की, अशा प्रकारे राजकीय दबावाखाली किंवा भ्रष्टाचाराच्या जोरावर महत्त्वाचे भूखंड गमावले गेले, तर शहराच्या नियोजनावर गंभीर परिणाम होईल. त्यांनी हेही स्पष्ट केले की, जर लवकरात लवकर अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली नाही, तर स्थानिक नागरिकांसह पुन्हा एकदा प्रभाग समिती व महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. तसेच भूमाफियांवर ‘मोक्का’ अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
या प्रकरणामुळे महापालिकेच्या भूमाफियांशी असलेल्या कथित संगनमताचे गंभीर संकेत मिळत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.