भाडे देण्यावरुन झाला वाद; मुजोर रिक्षा चालकाच्या भांडणामुळे प्रवाशाचा मृत्यू
कल्याण: कल्याण आणि आसपासच्या परिसरात दिवसेंदिवस रिक्षावाल्यांची मुजोरी वाढली आहे. याचपार्श्वभूमीवर टिटवाळ्यात अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रिक्षा चालकाला भाडे देण्यासाठी प्रवाशाने 50 रुपयांची नोट काढली. ही नोट फाटली असल्याने रिक्षा चालक आणि प्रवासी यांच्यामध्ये जोरदार भांडण झाले. भांडणात झटापटीमुळे प्रवासी अंशूमन शाही यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी रिक्षा चालक राजा भोईर याच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी रिक्षा चालक राजा भोईर याला अटक केली आहे.
हेही वाचा- Vidhansabha 2024: कल्याणमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; पदाधिकाऱ्यांनी केला शिंदे गटात पक्षप्रवेश
टिटवाळ्यातील हरी ओम व्हॅली बिल्डींग नंंबर 7 मध्ये अंशूमन शाही हे त्यांच्या कुटुंबासोबत राहत होते. त्यांना एक मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे. गुरुवार रात्री रिक्षातून ते घराजवळ आले. या वेळी त्यांनी प्रवासी भाडे देण्याकरीता50 रुपयांची नोट काढली. त्यावेळी रिक्षा चालकाने त्यांच्याजवळील 50 रुपयांची नोट फाटकी असल्याने ती घेण्यावरुन वाद झाला. या वादात रिक्षा चालक आणिअंशूमन यांच्या हाणामारी झाली. या हाणामारीत अंशूमन हे बेशुद्ध होऊन खाली कोसळले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांचा या घटनेत मृत्यू झाला. या प्रकरणी टिटवाळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुरेश कदम यांनी सांगितले की, अंशूमन यांचा भांडणानंतर ह्रदयविकाराने मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी रिक्षा चालक राजा भोईर याच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. या घटनेमुळे रिक्षा चालक प्रवाशांसोबत अनेक कारणावरुन हुज्जत घालतात. हा प्रकार उघड झाला आहे. त्यातून अंशूमन याचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.