कल्याण-डोंबिवलीत पोलिसांची 'ऑल आऊट' मोहीम
Kalyan-Dombivali: कल्याण-डोंबिवली परिसरात मागील काही दिवसांपासून भुरट्या चोऱ्या, तसेच रात्रीच्या वेळेत सार्वजनिक ठिकाणांवर मद्य आणि अंमली पदार्थांचे सेवन, तसेच छुप्या गैरधंद्यांचे अड्डे वाढीस लागल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कल्याण पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी रात्री मोठी छापा मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत एकूण २४० पोलिस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. रात्री आठ ते पहाटे चार या वेळेत कल्याण आणि डोंबिवली शहरातील विविध भागांत एकाच वेळी धरपकड मोहीम राबवण्यात आली. यामध्ये ३५० हून अधिक समाजकंटक, गुंड, मद्यपी आणि गैरधंदे करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.
गेल्या वर्षीही अशाच प्रकारची मोहीम सलग दोन ते तीन महिने राबवून पोलीस दलाने शहरातील अनेक गैरधंदे, अड्डे उद्ध्वस्त केले होते. सार्वजनिक ठिकाणी मद्य व अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागले होते. ही मोहीम ‘कल्याण-डोंबिवली नशामुक्त शहर’ या उद्दिष्टाचा भाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. अलीकडे पुन्हा काही अड्डे आणि अवैध व्यवहार सुरू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर उपायुक्त झेंडे यांनी आठही पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अचानक आदेश देऊन शनिवारी रात्री धडक छापा टाकण्याचे निर्देश दिले. या कारवाईत उपायुक्त झेंडे आणि साहाय्यक पोलीस आयुक्त स्वतः सहभागी झाले.
कल्याण रेल्वे स्थानक परिसर, वाहनतळ, आणि झाडाझुडपांमध्ये लपून मद्य व अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांना पोलिसांनी वेढा घालून ताब्यात घेतले. काहींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी चारही बाजूंनी घेराव घालून त्यांना पकडले. अनेक ठिकाणी पकडलेल्या व्यक्तींना परिसरातून पोलिसांनी वरात काढत पोलिस ठाण्यात आणले.
या कारवाईत मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांकडून तब्बल ४५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच सहा खतरनाक गुंडांना अटक करण्यात आली, तर २७ तडीपार गुंडांची चौकशी करण्यात आली. या मोहिमेत पकडलेल्या मद्यपींमध्ये काही सुस्थितीत घरातील तरुणांचाही समावेश असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. सर्व आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून न्यायालयीन कारवाई सुरू आहे. रात्री आठपासून पहाटे चारपर्यंत कारवाई सुरू होती.
KDMC : MIDC निवासीमध्ये कचरा संकलनसाठी घंटागाडीचा घोळ; स्थानिकांचे नाहक हाल






