मनसेच्या इशाऱ्यानंतर डोंबिवली स्टेशन परिसरात पालिका प्रशासनाची धडक कारवाई
डोंबिवली: डोंबिवलीच्या पूर्वेकडील स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा सोडवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला. मनसेच्या इशाऱ्यानंतर काल शनिवारी पालिका प्रशासनाने तगड्या पोलीस बंदोबस्तात स्टेशनजवळील पूर्वेकडील भागात प्रखर कारवाई केली. या कारवाईत अतिक्रमण केलेले फुटपाथ आणि अनधिकृत शेड्स जमीनदोस्त करण्यात आल्या.
डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त असला तरी, पूर्वेकडील भागात फेरीवाल्यांनी प्रचंड अतिक्रमण केले आहे. यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि मुलांना स्टेशन गाठणेही मुश्किल होत होते. या विषयावर मनसेने यापूर्वीही आंदोलन केले होते, त्यावेळी मनसैनिकांवर गुन्हे दाखल झाले होते. तरीही मनसेने शुक्रवारी डोंबिवली विभाग सहायक आयुक्त सुहास हेमाडे यांची भेट घेऊन फेरीवाल्यांवर कठोर कारवाईची ठाम मागणी केली होती. मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता.
मनसेच्या मागणीनंतर दुसऱ्याच दिवशी, शनिवारी पालिकेच्या ‘फ’ प्रभाग क्षेत्र सहायक आयुक्त हेमा मुंबरकर आणि ‘ग’ प्रभाग क्षेत्र सहायक आयुक्त भरत पवार यांच्या नेतृत्वात मोठी कारवाई करण्यात आली. पालिकेच्या पथकाने जेसीबीसीच्या (JCB) सहाय्याने अनधिकृत शेड्स जमीनदोस्त केल्या आणि टपऱ्या हटवल्या. फुटपाथवरील अतिक्रमण मोकळे केल्यामुळे लोकांना चालणे सोईस्कर झाले. या प्रथमच झालेल्या प्रखर कारवाईमुळे अनधिकृत फेरीवालेही अचंबित झाले होते.
हे देखील वाचा: KDMC : MIDC निवासीमध्ये कचरा संकलनसाठी घंटागाडीचा घोळ; स्थानिकांचे नाहक हाल
कारवाईदरम्यान उर्सेकर वाडीतील मधुबन गल्लीतील अधिकृत शेड्सही हटवण्यात आल्या. विशेष म्हणजे, याच गल्लीतील भाजी मंडईजवळ दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच दिसून आला. यामुळे या ठिकाणी रात्रीच्या वेळी दारूच्या पार्ट्या होतात का, असा प्रश्न उपस्थित झाला असून, नागरिकांनी रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.
मनसे कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी पालिका कारवाईचे आभार मानले, पण सातत्य ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी ‘दीडशे मीटर अंतर फेरीवाला मुक्त झालाच पाहिजे’ अशी मागणी केली. अनेक फेरीवाले परप्रांतीय असल्याचा दावाही त्यांनी केला. मनसे डोंबिवली शहराध्यक्ष राहुल कामत यांनी इशारा दिला की, “पूर्वेकडील स्टेशनबाहेरील फेरीवाल्यांवर पालिकेने कारवाईत सातत्य ठेवले नाही, तर नागरिकांसाठी वेळप्रसंगी मनसे फेरीवाल्यांशी संघर्ष करण्यास तयार आहे. डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेरील परिसर फेरीवाला मुक्त झालाच पाहिजे.”
हे देखील वाचा: Dombivali News : उकरड्यावर उभारलं वनवैभव; ज्येष्ठांसाठी निसर्गरम्य भ्रमंती कट्टा






