KDMC : परिसर स्वच्छ ठेवणं हे आरोग्यच्या दृष्टीने महत्वाचं आहे असं वारंवार सांगितलं जातं. मात्र कल्याण डोंबिवली एमआयडीसी परिसरातील निवासींमध्ये गेले काही दिवस घरगुती कचरा गोळा करण्यासाठी येणाऱ्या गाड्या नियमित किंवा वेळेवर येत नाहीत. काही ठिकाणी तर सलग दोन तीन दिवस घंटागाड्या न आल्याने रहिवासी बेजार होऊन त्यांनी तो राग, रोष समाज माध्यमातून प्रकट केला. परंतु याचा काहीही उपयोग होतांना दिसत नाही. सद्या चेन्नई पॅटर्न प्रमाणे एका खाजगी ठेकेदाराला कचरा उचलण्याचे कंत्राट दिले आहे. त्यांच्याकडे अपुऱ्या घंटागाड्या आणि अपुरे खाजगी कर्मचारी असल्याने हे होत आहे.
याशिवाय हे ओला व सुखा कचरा पुढे एकत्रच करीत असल्याचे दिसत आहे. घरगुती कचरा नियमित उचलला जात नसल्याने काही नागरिक नाईलाजास्तव तो कचरा रस्त्यावर कडेला पिशवीत ठेवून जात आहेत. आधीच रस्त्यावर झाडांचा पालापाचोळा व इतर कचरा जमा होत असताना त्यात हा घरगुती कचरा जमा झाल्याने सर्वत्र अस्वच्छता पसरली असून रोगराई होऊन आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. हा कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत असल्याने काही जागरूक नागरिकांनी ही बाब कल्याण डोंबिवली महापालिकेचे घन कचरा व्यवस्थापन उपायुक्त रामदास कोकरे यांच्याकडे तक्रार केली असून त्यांनी यात जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.
मिलापनगरमधील एक ज्येष्ठ नागरिक आणि वकील मुकुंद वैद्य यांनी केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांना ईमेल करून येथील परिस्थिचीची माहिती देऊन तक्रार केली आहे. जर परिस्थिती सुधारली नाही तर काहीजण यापुढे पंतप्रधान मुख्यमंत्री कार्यालयाकडे पण ऑनलाईन तक्रारी करणार आहेत. कचऱ्यासारखा एवढा गंभीर प्रश्न निर्माण झाला असलातरी येथील सर्व राजकीय पदाधिकारी इच्छुक उमेदवार यात पाहिजे तसे लक्ष घालताना दिसत नाही. त्यात ऐन दिवाळीत वीज पाणी पुरवठा अनेकदा खंडित होत होता. यामुळे निवासी भागातील जनता आता विटली असून एखादे प्रखर आंदोलन करण्याचा विचारात असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी दिली.
वाढत्या कचऱ्याच्या समस्येने याचा परिणाम आरोग्यावर होताना देखील दिसून येत आहे. परिसरातील निवासी ठिकाणी कचरा गोळा करण्यासाठी कर्मचारी नसावेत याचा अर्थ प्रशासनाचा किती हलगर्जीपणा होत आहे दिसून येत असल्याचा आरोप देखील नागरिकांनी केला आहे. इतकी गंभीर बाब असून देखील ना प्रशासन ना कोणी राजकारणी याची दखल घेत नाही अशी खंत देखील व्यक्त केली आहे.






