ठाणे/ स्नेहा काकडे : गेले दोन दिवस मुंबई आणि उपनगरात अवकाळी पावसाने धुमशान घातलं आहे. या पावसामुळे प्रवासातअडकलेल्या चाकरमान्यांचे मोठे हाल झाले आहेत. वादळीवाऱ्यासह आलेल्या या अवकाळी पावसामुळे मोठं मोठी झाडं उन्मळून पडल्याने नागरिकांच्या जीवावर बेतल्याचं देखील दिसून आलं आहे. अवकाळी पावसामुळे ठाण्यात ठिकठिकाणी वादळी पावसाने झाडं उन्मळून पडले आहेत. ठाण्यातील रुणवाल नगर, फ्लॉवर व्हॅली याठिकाणी एमएच ०४ जीएन ५९२० या बजाज ऑटो रिक्षा (मालक – शब्बीर) यांच्या रिक्षावर गुलमोहराचे झाड पडल्याने रिक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसानही झाले आहे. तसेच रिक्षा चालक आणि प्रवासी यांना गंभीर दुखापत झाली आहे. प्रवासी तौफिक सौदागर (पु / २७ वर्षे/ राहणार – गोदावरी बिल्डिंग, राबोडी) यांना गंभीर दुखापत झाली असून जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. रिक्षाचालक शफीक शब्बीर (पु / ५० ते ५५ वर्षे/ राहणार – राबोडी) यांच्या डोक्याला दुखापत झाली असून उपचाराकरिता नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनास्थळी पडलेले झाड कापून बाजूला करण्याचे काम सुरु आहे.
सदर घटनास्थळी उप आयुक्त सो. (वृक्ष प्राधिकरण), राबोडी पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी, वृक्ष प्राधिकरण विभागाचे अधिकारी, उथळसर प्र. समिती सहाय्यक आयुक्त सो., उद्यान अधिक्षक, अग्निशमन दलाचे जवान ०१- फायर वाहन व ०१- रेस्क्यु वाहनासह तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१- पिकअप वाहनासह उपस्थित आहेत.प्रवासी – तौफिक सौदागर (पु / २७ वर्षे/ राहणार – गोदावरी बिल्डिंग, राबोडी) यांना गंभीर दुखापत झाली असून जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असता, सदर व्यक्ती मृत असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले आहे, असे राबोडी पोलिसांनी सांगितले. पहिल्याच पावसामध्ये ठाणे शहरांमध्ये अनेक ठिकाणी झाडं पडली. यात एका २६ वर्षीय मुलाचा मृत्यू देखील झाला. या संपूर्ण मृत्यूला ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप ठाणे महानगरपालिकेचे वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य विक्रांत तावडे व नम्रता भोसले- जाधव यांनी केला आहे. याबाबत ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरव राव यांची भेट घेतली असून अत्याधुनिक पद्धतीने संपूर्ण ठाणे शहरातील झाडांची तपासणी करावी व जी झाडे धोकादायक असतील त्यांना मुळा सकट काढून टाकण्यात यावे जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवित हानी होणार नाही ठाणे महानगरपालिका जर करदात्यांकडून वृक्ष कर घेत असेल तर या कराच्या रकमेतून हा संपूर्ण खर्च करावा आणि संपूर्ण झाडांचे सर्वेक्षण करावे अशी मागणी या ठिकाणी या दोन्ही सदस्यांनी आयुक्तांकडे केली आहे.
मुंबई आणि उपनगराला पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालं असून बळीराजा हवालदीन झाला आहे. कापूस आणि आंबा बायागतदार शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असल्याचं समोर आलं आहे. ऐन आंब्याच्या मोसमात पावसाने हजेरी लावली त्यामुळे आंब्याचा मोहर देखील गळून गेल्याचं शेतकऱ्य़ांनी सांगितलं आहे. पुढचे अजून काही दिवस अवकाळी पाऊस असणार असल्याचं हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे.