डोंबिवली : पावसामुळे कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या हद्दीत खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं आहे. रस्त्यावरील खड्यांमुळे वाहन चालक आणि नागरिकांना अनेक आव्हानांना सामोरं जाव लागत आहे. पावसाळा सुरू होताच कल्याण डोंबिवलीतील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांचा त्रास वाहन चालकांना आणि रिक्षातून प्रवास करणाऱ्या नागरीकांना होत आहे. रस्त्यावरील खड्डयांमुळे रिक्षा चालक आणि प्रवासी याचे कंबरडे मोडले आहे. डोंबिवली पश्चिम येथील सुभाष रोड नवापाडा परिसरात रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे रिक्षाचालक हैराण झाले आहेत.
मात्र पालिकेचं या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने दररोजचा त्रास कमी करण्यासाठी रिक्षा चालक संतोष मिरकुटे यांनी स्वतः पुढाकार घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम केले आहे. खड्यांमधून प्रवास करताना चालक अक्षर: जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. या सगळ्यावर नागरिकांनी पालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेती अधिकारी फक्त एसीमध्ये बसून प्रतिक्रिया देतात की, खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात तसे होत नाही. अधिकाऱ्यांनी स्वतः या रस्त्यावर येऊन बघावे काय परिस्थिती आहे ? असा संतप्त सवाल रिक्षा चालक मिरकुटे यांनी उपस्थित केला आहे.
रिक्षा चालक मिरकुटे यांनी सांगितले की, रस्त्यावरील खड्ड्यामुळे प्रवासी आणि आम्हा रिक्षा चालकाना कमरेचा त्रास होतो. प्रशासनाने खड्डे भरलेले नाही. त्यामुळे मी स्वत: खड्डे भरले. प्रशासन कमी पडते. तिथे नागरीकांनी पुडाकार घेऊन अशा गोष्टी करायला पाहिजेत. तुम्हाला इथे खड्डे दिसता. प्रशासनाचे अधिकारी एसीमध्ये बसतात. एसीत बसून रस्ते झालेले आहेत. करायला पाहिजेत अशा बाता करतात. स्वत: रस्त्यावर येऊन गाडी चालवून बघा. नागरीक महापालिकेचा कर भरतात. आम्ही रिक्षा वाले सुद्धा दरवर्षी रिक्षा पासिंग करतो. तो कर सरकारच्या तिजोरीतच जमा होतो.
आम्हाला सुविधांच्या रुपात काही मिळत नाही. रस्त्यावरील खड्डयांमुळे कमरेचा त्रास मिळतो. रिक्षावाले मुजोर नसतात. रिक्षावालेही चांगले काम करणारे आणि प्रामाणिक असतात. एखादी घटना घडली तर रिक्षावाले मुजोर असा शब्द नका वापरू. महापालिकेस विनंती आहे. डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रोड ते नवा पाडा हा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे का परिस्थिती आहे ? ये येऊन बघा. माझी कळकळीची विनंती आहे. या रस्त्यावरील खड्डे स्वत: आयुक्तांनी येऊन पाहावेत. तेव्हा त्यांना कळेल रस्त्यावर खड्डे आहे की खड्ड्यात रस्ता आहे.