सावन वैश्य | नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत मोठ्या प्रमाणात जनरल बदली झाल्या आहेत. मात्र या बदल्या होऊन देखील बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी पोलिस चालढकल करत असताना दिसून येत आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीअंतर्गत पोलिस अंमलदार व पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र बदली होऊन सुद्धा पोलीस अंमलदार व अधिकारी अजून पर्यंत बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्याचे चित्र दिसत आहे. बदलीचे ठिकाण राहत्या घरापासून दूर असल्याचे काहींनी कारण दिले, तर काहींना पोलीस ठाण्याचे अथवा त्या विभागाचे अधिकारीच सोडत नसल्याची चर्चा सध्या वर्तुळात रंगत आहे. तर काहींना आवडीचे ठिकाण न मिळाल्याने हजर न झाल्याचं समोर येतंय. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या या खांदेपालट ची चर्चा पोलीस वर्तुळात मोठ्या प्रमाणात रंगत आहे.
बदल हा प्रकृतीचा नियम आहे. याच बदलामुळे निसर्गाचा समतोल राखला जातो. सामाजिक समतोल राखण्यासाठी अनेक वेळा शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. एवढेच नव्हे तर मतदार राजा मतदानाच्या रूपाने मत देऊन सरकार देखील बदलते, जेणेकरून मतदारांच्या समस्या सोडवल्या जाव्यात. नवी मुंबईत शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच गुन्ह्यांचा आलेख कमी व्हावा यासाठी आयुक्तालय अंतर्गत मोठ्या प्रमाणात जनरल बदल्या करण्यात आले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांना पोलीस ठाणे, वाहतूक कक्ष, अथवा अन्य विभागात 2 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करावा लागतो. तर अंमलदारांना 7 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करावा लागतो.
त्यानंतर आयुक्तालयाच्या आलेल्या आदेशानुसार अंतर्गत बदल्या केल्या जातात. मात्र नवी मुंबई पोलिसांनी बदली करून देखील अनेक अधिकारी व अंमलदारांनी नेमणुकीच्या ठिकाणी न जाण्याचा पसंत केलं आहे. काहींनी नेमणुकीचे ठिकाण घरापासून दूर असल्याचं सांगितलं आहे. तर काहींनी नावडत्या ठिकाणी मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. तर काहींना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामामुळे तेथील अधिकारी सोडत नसल्याची माहिती समोर येत आहे.
पोलीस प्रशासन देखील परिसरातील विविध भागांचा आढावा घेऊन, तसेच तेथील गुन्ह्यांची माहिती घेऊन तशा प्रकारच्या अधिकारी व अंमलदारांची बदली करतात.
जेणेकरून त्या ठिकाणच्या गुन्हेगारीला आळा बसून शहरात शांतता व सुव्यवस्था राहावी. त्यामुळे नेमणूक झालेल्या ठिकाणी अधिकारी व अंमलदार रुजू होतात का? किंवा आवडत्या ठिकाणी बदली व्हावी यासाठी वशिला लावतात, हे काही दिवसात दिसेल.