नवी मुंबई : घणसोलीत घरपोडी करून २ लाख ३७ हजारांचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याची तक्रार रबाळे पोलिसात दाखल झाली होती. घटनास्थळावरील सीसीटीव्ही, तांत्रिक तपास व गुप्त बातमीच्या आधारावर अंकुश उत्तम ढगे यास घनसोलीमधून अटक करून एकूण बारा गुन्ह्यांची उकल करून तब्बल १२ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
रघुनाथ सखाराम शेलार हे घणसोलीतील रहिवासी असून ते नातेवाईकांना भेटण्यासाठी खांदा कॉलनी येथे गेले असता अज्ञात इसमाने त्यांच्या घराची कडी तोडून कपाटातील दागिणे व रोख रक्कम असा एकूण २ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. तक्रार त्यांनी रबाळे पोलीस ठाण्यात दाखल केली होती. याबाबत वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ पोलीस निरीक्षक उन्मेश थिटे व गुन्हे प्रकटीकरणाचे अधिकारी दीपक खरात व पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही, तांत्रिक तपास तसेच बातमी दाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारावर अंकुश उत्तम ढगे वय ३९ वर्ष, राहणार घनसोली गाव, याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याच्यावर एकूण १२ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यांची उकल काढण्यात रबाळे पोलिसांना यश आले आहे. १२ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
अंकुश ढगे हा सराईत गुन्हेगार असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. अंकुश ढगे याच्यावर कोपरखैरणे पोलीस ठाण्यात ११, रबाळे, आझाद मैदान, कोनगाव व एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे एकूण १५ गुन्हे दाखल आहेत. आरोपी हा रात्रीच्या घरफोड्या करून सोने-चांदी चोरून मिळालेल्या रकमेतून उदरनिर्वाह व मौजमजा करत असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले.