विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात! केडीएमसीच्या १८ शाळांची दुरावस्था
कल्याण-कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या १८ शाळांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. महापालिकेचे अधिकारी केवळ चांगल्या शाळा दाखवून आयुक्तांची दिशाभूल करीत आहे. दुरावस्था झालेल्या १८ शाळांना आयुक्तांनी सरप्राईज व्हीजीट करावी अशी मागणी शिंदे सेनेचे माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आज (3 जुलै) केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली. त्यांना दुरावस्था झालेल्या १८ शाळांची यादीच आयुक्तांकडे सूपूर्द केली आहे. आयुक्तांनी त्यांच्या मागणीची दखल घेत या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाईल असे आश्वासन देण्यात आले.
याप्रकरणी माजी नगरसेवक शिंदे यांनी सांगितले की, महापालिका आयुक्तांनी शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी चांगले उपक्रम सुरु केले आहे. त्यात महापालिका आयुक्तांनी शैक्षणिक उपक्रमाला उपस्थीती लावून प्रोत्साहन दिले आहे. तसेच काही शाळांची रंगरंगोटी करून शालेय साहित्य पुरविले आहे. त्याठीकाणी भेटही दिली आहे, मात्र महापालिका हद्दीतील १८ शाळांची दुरावस्था झाली आहे. या शाळेत अस्वच्छता असून पाण्याच्या पाण्याची सोय नाही. प्रसाधानगृहांची दुरावस्था झाली आहे. यामुळे मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. या शाळांना आयुक्तांनी सरप्राईज व्हीजीट दिली तर खरी परिस्थिती उघड होईल. मोहिली येथील महापालिकेची शाळा फेब्रुवारी महिन्यात बांधण्यास सुरुवात केली आहे. या शाळेचे बांधकाम अद्याप पूर्ण झाले नाही. ते काम पूर्ण होण्यास आधीच सहा महिन्याचा अवधी लागणार आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होणार आहे. त्याचे काय ? असा सवाल शिंदे यांनी आयुक्तांकडे उपस्थित केला आहे.
त्याचबरोबर महापालिकेच्या अग्नीशमन दलात १२० तरुण हे २०१९ पासून काम करीत आहे. अग्नीशमन दलात काम करणे हे जोखमीचे काम आहे. त्या तरुणांना १७ ते १८ हजार रुपये पगार देऊन राबवून घेतले जात आहे. त्यांना राज्य सरकारच्या निर्णयानुसार ३० हजार रुपये किमान वेतन द्यावे. महापलिकेची रिक्त पदाची भरती प्रक्रिया सुरु आहे. त्याठीकाणी रिक्त असलेल्या पदांवर या तरुणांना महापालिकेच्या कायम स्वरुपी सेवेत समावून घ्यावे अशी मागणीही शिंदे यांनी आयुक्तांकडे केली आहे.