'हिटमॅन' रोहित शर्माचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसा आहे रेकाॅर्ड? (Photo Credit - X)
आफ्रिकेविरुद्ध रोहितने ठोकली आहेत ३ शतके
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे क्रिकेटमधील रोहित शर्माचा रेकॉर्ड दमदार आहे. रोहितने प्रोटियाज संघाविरुद्ध आतापर्यंत एकूण २६ सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ८०६ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने तीन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत. आफ्रिकी संघाविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये रोहितने आतापर्यंत एकूण ८६ चौकार आणि २० षटकार लगावले आहेत.
दोन वर्षांनी आफ्रिकेविरुद्ध मैदानात
रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा शेवटचा वनडे सामना २०२३ मध्ये खेळला होता. त्या सामन्यात त्याने २४ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने एकूण ४० धावा केल्या होत्या. आता तब्बल दोन वर्षांनंतर तो पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार प्रदर्शन
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळला होता. त्या मालिकेत त्याने दुसऱ्या वनडेत ७३ धावा आणि तिसऱ्या वनडे सामन्यात १२१ धावांची दमदार खेळी केली होती. या कामगिरीमुळेच त्याला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’चा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.
सलामीसाठी ऋतुराज आणि जयस्वालची उपस्थिती
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत नियमित कर्णधार शुभमन गिल दुखापतीमुळे खेळू शकत नाहीये. याच कारणामुळे कर्णधारपदाची जबाबदारी केएल राहुल (KL Rahul) सांभाळत आहे. अशा परिस्थितीत सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, गिलच्या अनुपस्थितीत रोहित शर्मासोबत सलामीला (Opening) कोण खेळणार? रोहितसोबत सलामी देण्यासाठी टीम इंडियाकडे ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल या दोन पर्यायांच्या रूपात युवा फलंदाज उपलब्ध आहेत. या दोघांपैकी एका खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.






