मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी सोमवारी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर त्यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चेला उधाण आले होते. अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशोक चव्हाण यांच्या भूमिकेवर राज्यभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनीही अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. कुणाल पाटील म्हणाले की, मी कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस सोडणार नाही. मी काँग्रेस सोडणार याची चर्चा कुठून सुरू झाली हे माहिती नाही. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्याने पक्षाचे मोठं नुकसान झाले आहे. पण काँग्रेसचा विचार आम्ही समर्थपणे पुढे घेऊन जाऊ, असे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसने असे अनेक धक्के पाहिले आहेत. पण काँग्रेस संपली नाही. भविष्यात काँग्रेसला खूप मोठं यश मिळणार यात काही शंका नाही. वडिलांची प्रकृती ठीक नसल्याने उद्या मुंबईच्या बैठकीला जाणार नाही, वेगळा अर्थ काढू नये, असेदेखील आमदार कुणाल पाटील यांनी म्हटले आहे.