ठाणे-मुंबई : ठाण्यासह मुंबईतील रस्त्याच्या कडेला, इमारत-चाळींच्या आवारात पार्क केलेल्या रिक्षा लांबविणाऱ्या सराईत चोराला कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून क्राईम ब्रँचने सातही गुन्ह्यांची उकल करून ७ रिक्षा हस्तगत करण्यात यश मिळविले आहे.
सोहम दिपक इस्वलकर (23, रा. नंदनवन, जय साल्पादेवी सोसायटी, पी. के. रोड, मुलुंड-पश्चिम) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
गुरूवारी दुपारच्या सुमारास एक जण कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या नांदिवलीतील एका ढाब्यावर येणार असल्याची पक्की खबर पोना दिपक महाजन यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या नेतृत्वाखाली सपोनि संतोष उगलमुगले, फौजदार संजय माळी, हवा. विश्वास माने, हवा. विलास कडू, हवा. बालाजी शिंदे, हवा. अनुप कामत हवा. बापू जाधव, हवा. जोत्स्ना कुभारे, हवा. मेघा जाने, पोना. दिपक महाजन, पोशि. गुरूनाथ जरग, पोशि. गोरक्ष शेकडे, पोशि. विजेंद्र नवसारे, पोशि. मंगल गावीत या पथकाने परिसरात असलेल्या काकाच्या ढाब्याजवळ जाळे पसरले. या जाळ्यात सोहम इस्वलकर असे स्वतःचे नाव सांगणारा अलगद सापळ्यात अडकला. त्याच्याकडून MH 05/ डी एल/ 2165 क्रमांकाची ऑटो रिक्षा हस्तगत केली.
अधिक चौकशी केली असता त्याने मुंबईतील धारावी, कुर्ला, विक्रोळी, कांजुरमार्ग, तर ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरातून रिक्षा चोरल्याची कबूली दिली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरलेली रिक्षा उल्हासनगरातील एका मैदानात ठेवल्याची माहिती दिली. गुन्हे अन्वेषण शाखेने उल्हासनगरातील व्ही. टी. सी. मैदानातून MH 05/सी जी/ 5796 क्रमांकाची ऑटो रिक्षा हस्तगत केली. त्यानंतर इतर पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या गुन्ह्यांतील ३ लाख १० हजार रूपये किंमतीच्या ७ रिक्षा हस्तगत करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक नरेश पवार यांनी सांगितले.