Photo Credit : Team Navrashtra
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे बीड दौऱ्यावर असताना चांगलाच राडा झाला. राज ठाकरेंचा ताफा बीड जिह्यात पोहचला असता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुपाऱ्या फेकत आणि मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी केली.यानंतर वातावरण चांगलेच चिघळले होते. या प्रकरणी आठजणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. पण यानंतर उद्धव ठाकरे गट आणि मनसेमध्ये राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झालीआहे.
मनसे नेते संदीप देशपांडे आणि ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यातही चांगलीच शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. कालच्या आंदोलनानंतर संदीप देशपांडे यांनी सुरुवात त्यांनी केली आहे, आता शेवट आम्ही करू ठाकरे गटाला थेट इशाराच दिला. इतकेच नव्हे तर राज ठाकरेंनी आदेश दिला तर आम्ही उद्धव ठाकरेंना मातोश्रीच्या बाहेर पडू देणार नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
त्यांच्या या इशाऱ्याही उद्धव ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी देखील प्रत्युत्तर दिले. दानवे म्ङणाले, बऱ्याच दिवसांनी सुपारीचं पीक चांगलं आले आहे. त्यामुळे या सुपाऱ्या फेकल्या असतील.पण हे प्रतिकात्मक आहे. कारणज्या पद्धतीने सुपाऱ्या घेऊन मनसे राजकारण केल जाते त्याची ही प्रतिक्रीया आहे. सगळ्या सुपाऱ्या आपण पाहिल्या आहेत आणि शिवसैनिकांनी जे आंदोलन केले ते योग्यच आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात एका पत्रकार परिषदेत महाराष्ट्रात कोणत्याही समाजाला आरक्षणाची गरज नाही, अशा आशयाचे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते. तेव्हापासून राज्यभरात त्यांच्याविरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. बीडमध्येही त्याचे असेच पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरे बीड दौऱ्यावर असताना काही आंदोलकांनी त्यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्या आणि मराठा आराक्षणासाठी जोरदार घोषणाबाजीही केली.
याचवेळी मनसे आणि उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये जोरदार राडा झाला. मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि दोन्ही गटाकडून धक्कबुक्की झाली. पण पोलिसांनी प्रसंगावधान राखत वाद वाढण्याआधीच मध्यस्थी करून प्रकरण शांत केले. पण या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.