फोटो सौजन्य - Social Media
ठाणे शहराच्या वाहतुकीचा बोजा हलका करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणारा कासारवडवली उड्डाणपुलाचा पहिला टप्पा अखेर ८ जुलै २०२५ रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यात बोलताना मंत्री सरनाईक यांनी या प्रकल्पाशी जोडलेली आपली भावना आणि त्यामागचा संघर्ष उलगडला.
सरनाईक म्हणाले की, “लोकप्रतिनिधी या नात्याने घोडबंदर, गायमुख आणि कासारवडवली परिसरातील नागरिकांची वाहतूक कोंडीमुळे होणारी गैरसोय मी जवळून पाहिली आहे. त्यामुळे उड्डाणपूल उभारण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारामुळे या प्रकल्पाला निधी मंजूर झाला आणि काम वेगात सुरू झाले.”
या उड्डाणपुलामुळे ठाणे – बोरीवली – वसई – जेएनपीटी – गुजरात या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक अधिक सुलभ होणार आहे. विशेषतः गायमुख ते वाघबिळ दरम्यानची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला. उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूची मार्गिका (सर्विस लेन) नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे. उजव्या बाजूचे उर्वरित बांधकाम पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या प्रकल्पामुळे ठाण्याच्या पायाभूत विकासाला गती मिळणार असून, भविष्यात अशा प्रकारच्या अधिक प्रकल्पांची गरज भासणार आहे. “ठाण्याच्या गतिमान विकासासाठी आणि वाहतुकीच्या अडचणी कमी करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू,” असेही मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. या उद्घाटनप्रसंगी स्थानिक नगरसेवक, अधिकारी, ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. लोकांनीही या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.