(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
जागतिक पातळीवर पर्यावरणीय संकट अधिक तीव्र होत असताना, भारतीय चित्रपटसृष्टीत मात्र या वास्तवाचं प्रतिबिंब फारसं दिसून येत नाही. अनेक दशकांपासून बॉलिवूड हे देशातील विविध पार्श्वभूमीतील लोकांना एकत्र आणणारं माध्यम ठरलं आहे. सिनेमांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक विचार घडवण्याचंही काम केलं आहे.
तरीही आजच्या घडीला, उष्णतेच्या लाटा, पाण्याची टंचाई, प्रदूषण आणि हवामान बदल हे प्रश्न सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनले असतानाही, बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहातील कथांमध्ये हे विषय दुय्यम ठरताना दिसतात. बहुतांश सिनेमे आजही प्रेमकथा, भव्य स्वप्नं आणि वास्तवापासून दूर नेणाऱ्या कथांभोवतीच फिरताना दिसतात.
जागतिक सिनेमात मात्र बदल स्पष्टपणे जाणवतो. पर्यावरण, संसाधनांची कमतरता आणि मानवी जबाबदारी यांसारखे विषय आता कथाकथनाचा अविभाज्य भाग होत आहेत. याउलट बॉलिवूडमध्ये पर्यावरणकेंद्री चित्रपट क्वचितच दिसतात आणि आले तरी ते मर्यादित प्रेक्षकांपुरतेच राहतात.पर्यावरणाबाबत अधिक जागरूक झालेल्या नव्या पिढीसमोर हा विरोधाभास ठळकपणे उभा राहतो आहे. त्यामुळे बदलत्या वास्तवाशी सुसंगत कथाकथन स्वीकारण्याची वेळ बॉलिवूडसाठी आता अपरिहार्य ठरत आहे.
गेल्या काही वर्षांत हॉलीवूडने आपल्या कथाकथनाचा दृष्टिकोन मोठ्या प्रमाणावर बदलला आहे. आधी जिथे सिनेमे फक्त एलियन्स, सुपरहिरो आणि भव्य फँटसीवर आधारित असायची, तिथे आता संसाधनांची टंचाई, प्रदूषण, हवामान बदल आणि पृथ्वीशी संबंधित नैतिक प्रश्न या विषयांना मुख्य प्रवाहात स्थान मिळालं आहे.
“डोंट लुक अप” आणि “अँ इनकन्व्हिनियंट ट्रुथ”सारख्या सिनेमांनी पर्यावरणीय संकटाला मनोरंजनात्मक आणि प्रभावी पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडलं आहे. हा बदल दर्शवतो की, आजचा प्रेक्षक फक्त रोमहर्षक दृश्यं पाहण्यापर्यंत मर्यादित नाही; त्याला वास्तवाशी जोडलेले सामाजिक आणि नैतिक प्रश्न देखील आकर्षित करतात.
भारतीय सिनेमात मात्र हा बदल अजूनही स्पष्ट दिसत नाही. बॉलिवूडमध्ये प्रेमकथा, भव्य नाट्यमय दृश्यं आणि फँटसीकथांवर भर असतो, तर पर्यावरणीय किंवा सामाजिक वास्तव केंद्रस्थानी ठेवणारे चित्रपट दुर्मिळ आहेत. त्यामुळे, हॉलीवूडच्या या बदलत्या प्रवाहाच्या तुलनेत बॉलिवूड अजूनही पारंपरिक कथानकात अडकलेला दिसतो.
विशेषज्ञांचे म्हणणे आहे की, जागरूक प्रेक्षकांची संख्या वाढत असल्याने बॉलिवूडसाठी आता पर्यावरणीय आणि सामाजिक वास्तव सादर करण्याची मोठी संधी आहे. भविष्यातील सिनेमात या विषयांना स्थान देणे केवळ आवश्यक नाही, तर सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे ठरणार आहे. बॉलिवूडची हीच द्विधा स्थिती काहीशी विरोधाभासीही वाटते. कारण आजची पिढी विशेषतः जेन-झी पर्यावरणाबाबत पूर्वीपेक्षा अधिक जागरूक आहे. प्रचंड उष्णता, पूर आणि प्रदूषित हवा हे आता केवळ बातम्यांपुरते राहिलेले नाहीत. ते दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत. कचरा वर्गीकरण, सस्टेनेबिलिटी आणि स्मार्ट सिटीज हे शब्द आता फक्त ‘बझवर्ड्स’ राहिलेले नाहीत.
मुंबई क्लायमेट वीकसारखे प्लॅटफॉर्मही हाच बदल प्रतिबिंबित करतात नागरिकांच्या पुढाकारातून उभा राहिलेला हा उपक्रम पर्यावरणाला केवळ धोरणात्मक चर्चेपुरता न ठेवता, एक सांस्कृतिक आणि सामाजिक वास्तव म्हणून मांडतो. संदेश साधा आहे पर्यावरणाविषयी चर्चा फक्त कॉन्फरन्स रूममध्येच नव्हे, तर दैनंदिन संभाषणातही व्हायला हव्यात.
”मी गरोदर आहे…”, दुसऱ्यांदा आई होणार Rubina Dilaik, व्हिडिओ शेअर करत म्हणाली,…
मग प्रश्न सरळ आहे बॉलिवूड फक्त एस्केपिझमपुरतं मर्यादित राहणार आहे की वास्तवातील मुद्देही रंजक पद्धतीने मांडण्याचं कसब भारतीय सिनेमा आत्मसात करणार आहे? आजच्या चिंता आणि अस्वस्थता मोठ्या पडद्यावर उतरण्याची वेळ आता आलीय.आज, जेव्हा संस्कृती आणि पर्यावरण एकाच फ्रेममध्ये उभे आहेत, तेव्हा अपेक्षा एवढीच आहे की बॉलिवूड ‘ग्रीन स्टोरीटेलिंग’ला कंटाळवाणा धडा न मानता, आपल्या पुढील मोठ्या उत्क्रांतीकडे टाकलेलं पाऊल म्हणून पाहील.






