म्हाडाच्या घरांची सोडत लांबणीवर
मुंबई : म्हाडाच्या योजनेंतर्गत अनेकांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे. त्यात अनेकजण म्हाडाच्या सोडतीकडे डोळे लावून होते. मात्र, आता ही घरांची सोडत लांबणीवर पडली आहे. पुणे मंडळाच्या ४१८६ घरांसाठीच्या सोडतीचा समावेश आहे. या घरांसाठी १६ किंवा १७ डिसेंबरला सोडत काढली जाईल, असे पुणे मंडळाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता तांत्रिक अडचणींमुळे ही सोडत रद्द करण्यात आल्याने दोन लाख १५ हजार अर्जदारांची सोडतीची प्रतीक्षा वाढली आहे.
म्हाडाच्या घरांच्या सोडतीची नवीन तारीख अद्याप मंडळाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. एक-दोन दिवसात नवीन तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजता पात्र अर्जाची प्रारूप यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. सप्टेंबरमध्ये पुणे मंडळाने पुण्यातील ४१८६ घरांसाठी ११ सप्टेंबरपासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू केली. पुणे मंडळाला २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या ३२२२ घरांसह १५ टक्के एकात्मिक योजनेतील ८६४ घरांचा या सोडतीत समावेश आहे.
हेदेखील वाचा : मराठवाड्याच्या विकासाला मिळणार चालना; छत्रपती संभाजीनगरमध्ये लवकरच होणार आंतरराष्ट्रीय विमानतळ
दरम्यान, ४१८६ घरांसाठी सोडतपूर्व प्रक्रिया झाली. मात्र, संगणकीय प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे या प्रक्रियेस दोनदा मुदतवाढ देण्याची नामुष्की मंडळावर आली.
16 डिसेंबरला होणार होती सोडत
म्हाडा घरांसाठी १६ वा १७ डिसेंबरला सोडत काढली जाईल, असे पुणे मंडळाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता १६ वा १७ डिसेंबरला सोडत होणार नसल्याची माहिती पुणे मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तांत्रिक कारणामुळे सोडत लांबणीवर पडल्याचे मंडळाकडून सांगितले जात आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन लाख १५ हजार अर्जाची छाननी पूर्ण करून त्यांची प्रारूप यादी पूर्ण करण्यास विलंब झाल्याने सोडत लांबणीवर पडली आहे.
अनामत रकमेपोटी 446 कोटी जमा
मुदतवाढीमुळे २१ नोव्हेंबरची सोडत ११ डिसेंबरवर गेली, नंतर ११ डिसेंबरची सोडतही पुढे ढकलावी लागली. मात्र, सोडतीची नवीन तारीख जाहीर न करताच पुणे मंडळाने सोडतपूर्व प्रक्रिया पूर्ण केली. त्यानुसार ४१८६ घरांसाठी अनामत रक्कमेसह दोन लाख १५ हजार ८४७ अर्ज सादर झाले आहेत. या अर्जाच्या माध्यमातून अनामत रक्कमेच्या पोटी माध्यमातून मंडळाकडे ४४६ कोटी ९७ लाख रुपये जमा झाले आहेत.






