संग्रहित फोटो
बारामती : आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. निवडणुका लवकरच होणार आहेत. राजकीय नेत्यांचे विविध भागात दौरेही वाढले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही दिले आहेत. अशातच आता बारामती नगरपरिषद व माळेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवार दिनांक १३ नोव्हेंबर रोजी घेणार आहेत.
बारामती शहरातील राष्ट्रवादी भवन मध्ये या मुलाखती होणार आहेत. बारामती नगरपालिका व माळेगाव बुद्रुक नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या मोठी आहे. बारामती नगर परिषदेची निवडणूक तब्बल नऊ वर्षानंतर होत आहे, बारामतीचे नगराध्यक्षपद हे सर्वसाधारणसाठी आहे, तर माळेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. बारामती नगरपरिषद ही पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक नगरसेवक असलेली नगर परिषद आहे. या निवडणुकीमध्ये तब्बल ४१ नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत, तर नगराध्यक्ष ही जनतेमधूनच निवडून द्यावा लागणार आहे. त्यामुळे उमेदवारी देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कस पणाला लागणार आहे.
माळेगाव नगरपंचायतीची निवडणूक माळेगाव नगरपंचायतच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच होत आहे, यापूर्वी माळेगाव बुद्रुक ही ग्रामपंचायत होती, गेल्या तीन वर्षांपूर्वी माळेगाव बुद्रुक ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतीत झाले. माळेगावची ही पहिलीच नगरपंचायतीची निवडणूक होणार असल्याने राष्ट्रवादीसाठी विशेषता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. या नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखाना व शिवनगर विद्या प्रसारक मंडळ आहे. त्यामुळे साहजिकच या नगरपंचायतीची निवडणूक एखाद्या नगरपरिषदेच्या निवडणुकीपेक्षा गाजणार आहे.
दरम्यान बारामती नगरपरिषदेच्या नगरसेवक पदांची संख्या ४१ असल्याने यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उमेदवारी देताना मोठी दमछाक होणार आहे. बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक व त्यांच्या समर्थकांनी गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार फिल्डिंग लावली आहे. मात्र उमेदवार देताना नेहमीप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या फ्रेम मध्ये बसणाऱ्या कार्यकर्त्यालाच संधी देतात, हे आतापर्यंतच्या निवडणुकांवरून स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून विविध निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इच्छुकांनी आपल्या कामाची माहिती देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान गुरुवारी सकाळी बारामती नगर परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत, दुपारनंतर माळेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. बारामती शहरातील कसबा येथील राष्ट्रवादी भवनमध्ये या मुलाखती पार पडणार आहेत.






