संग्रहित फोटो
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रचंड स्पर्धा पाहायला मिळाली.१६५ जागांसाठी तब्बल २३०० इच्छुक रिंगणात उतरल्याने उमेदवार निवडताना पक्षनेतृत्वाला कठोर निर्णय घ्यावे लागले. विविध निकष, सर्वेक्षण आणि संघटनात्मक गणिते लक्षात घेत अनेकांना डावलण्यात आले. यात काही माजी नगरसेवकांचाही समावेश असल्याने पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली. हीच नाराजी राष्ट्रवादी काँग्रेससाठी संधी ठरली आहे. भाजपकडून संधी न मिळालेल्या अनेक माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत भाजपविरुद्ध दंड थोपटला आहे.
सुस–बाणेर–पाषाण प्रभागातून माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी थेट राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. राष्ट्रवादीने याच प्रभागात विद्यमान इच्छुकांना बाजूला ठेवत बालवडकर यांना उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. याशिवाय भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश ढोरे, अर्चना मुसळे तसेच भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले आरपीआय (आठवले गट) चे डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
दरम्यान, भाजपनेही बंडखोरांच्या प्रभावाला रोखण्यासाठी स्वतंत्र रणनीती आखली असून, पारंपरिक मतदारसंघ टिकवून ठेवण्यासाठी संघटनात्मक ताकद वापरण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे पुणे महापालिकेची निवडणूक ही केवळ पक्षांतील नव्हे, तर माजी सहकाऱ्यांमधील थेट लढत ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.






