रायगड,पाली: ऐन गणेशोत्सवात गणेश भक्तांना रस्त्यावरील खड्य़ाच्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. अवघ्या दोन तीन वर्षांपूर्वी रुंदीकरण पूर्ण झालेल्या वाकण पाली खोपोली राज्य महामार्गावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या या मार्गाच्या दुरावस्थेमुळे गणेश भक्तांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागला आणि आता पुन्हा एकदा परतीचा प्रवासीही खड्ड्यातून होणार आहे. त्यामुळे या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व निषेध करण्यासाठी सुधागड मनसेतर्फे सोमवारी तालुकाध्यक्ष सुनील साठे यांच्या नेतृत्वाखाली जांभूळपाडा येथील खड्ड्यात साठलेल्या पाण्यात होड्या सोडून अनोखे आंदोलन करण्यात आले.
या मार्गावरील खड्ड्यात आदळून अनेक अपघात होत आहेत. वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. काही जणांचा जीव देखील गेला आहे. त्यामुळे प्रवासी व नागरिकांचा संताप आता अनावर होत आहे. खड्ड्यात होडी सोडणे आंदोलनावेळी मनसे सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे, उप तालुका अध्यक्ष अजय अधिकारी, पेण सुधागड सचिव वाहतूक सेना रवींद्र कदम, गाठेमाळ शाखा अध्यक्ष मारुती वारे, ग्रामपंचायत सदस्य रमेश पवार, ग्रामस्थ राजू मांडवकर, अविनाश शिंदे, प्रशांत कदम, उमेश अधिकारी आदिवासी प्रतिष्ठान अध्यक्ष सचिन सागळे, मिलिंद नखाते, रवी पवार तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
या मार्गावर पाली मिनिडोअर स्थानक, देवन्हावे, मिरकुटवाडी, इमॅजिका, उंबरे, गोंदाव फाटा, दुधाने वाडी, वऱ्हाड, जांभुळपाडा प्रवेशद्वार, रासळ, पाली, बलाप व राबगाव या गावांजवळ खड्डे पडले आहेत. तसेच इतर ठिकाणी देखील कमी अधिक प्रमाणात खड्डे आहेत. यामुळे येथे वारंवार अपघात होतात. या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघाताची मालिका सुरूच आहे, त्यात अनेक निष्पापांचा बळी जात आहे. तर काहीना अपंगत्व आले आहे.
खर्च वाया
वाकण पाली खोपोली हा राज्य महामार्ग क्र. 548 (अ) एकूण 39 किलोमीटर लांबीचा आहे. सदर रस्त्याचे काम 2016 पासून शासनाच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरु करण्यात आले आणि दोन ते तीन वर्षांपूर्वी पूर्ण झाले. मात्र इतके वर्षे काम सुरु असलेल्या या मार्गाच्या कामाच्या दर्जाच्या बाबत अनेकांनी प्रश्न निर्माण केला आहे. शासनाकडून सुमारे 200 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या मार्गाच्या दुरावस्थेमुळे प्रवासी व नागरिक संतप्त आहेत.
आंदोलने व निषेध
या मार्गावरील खड्डे योग्य प्रकारे भरण्यासाठी स्थानिकांनी मागील दोन महिन्यात दोन वेळा आंदोलन केले. खड्ड्यामंध्ये झाडे लावून तसेच फलक दाखवून हे आंदोलन करण्यात आले. मात्र अजुनपर्यंत कोणतीच ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. खड्ड्यात वाहन अधून अनेक जण गंभीर जखमी होत आहेत. तर अनेकांना जीव गमवावा लागला आहे. एमएसआरडीसी प्रशासन मात्र रस्त्याच्या दुरावस्थे संदर्भात मूग गिळून बसले आहे. विशेष म्हणजे या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत समाज माध्यमांवर नागरिक आपल्या भावनांचा निचरा करत आहेत. शासन, राज्यकर्ते, एमएसआरडीसी व ठेकेदाराबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत आहेत.
खुश्कीचा मार्ग पण त्रासदायक
वाकण पाली खोपोली राज्य महामार्ग मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. तसेच दक्षिण कोकणातून पुणे व मुंबईला मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गाने जाणारे प्रवाशी व वाहने याच मार्गावरून जातात. अनेक प्रवासी व वाहने याचा वापर करतात. कोकणातून पुणे मुंबई या ठिकाणी परतणारे कोकणकर देखील या मार्गाचा वापर करतील. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे कोकणकर व प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे.
वाहनांचे नुकसान
या मार्गावरील खड्डे इतके मोठे व खोल आहेत की या खड्ड्यात दुचाकी व चारचाकी वाहने आदळून अपघात तर होत आहेतच त्याशिवाय वाहनांचे टायर फुटले तर चाकांचे रिंग दबल्या आहेत. त्यामुळे प्रवासी व वाहक चालक यांना नुकसान सोसावे लागत आहे. असे पालीतील सामाजिक कार्यकर्ते अमित निंबाळकर यांनी सांगितले.
गणपती उत्सव संपत आला तरी देखील एम.एस.आर.डी.सी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना हे खड्डे दिसत नसावेत, त्यांचे लक्ष वेधण्यासाठी व निषेध म्हणून सुधागड मनसेने खड्ड्यात होडी सोडा आंदोलन केले. एमएसआरडीसी अजून किती अपघातांची वाट बघणार आहे. रस्त्याची दुरवस्था व खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. अनेकांचा मृत्यू झाला अनेक जण गंभीर जखमी होत आहेत. या रस्त्याची लवकर लवकर दुरुस्ती करून खड्डे चांगल्या प्रकारे भरण्यात यावेत, असं सुधागड तालुका मनसेचे अध्यक्ष सुनील साठे यांनी सांगितलं आहे.