कर्जत/ संतोष पेरणे : नेरळ स्थानकाचा कायापालट होत असून प्रवाशांना चांगल्या सोयी देण्याच्या उद्देशाने विकासकाम सुरु आहे. मात्र या ही कामं कासवाच्या गतीने पुढे जात असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म 1 च्या मध्यभागी सरकता जिना बसविला जात आहे. या सरकत्या जिन्याचे काम अगदी कासवगतीने सुरू असून स्थानकात एकही सरकता जिना उपलब्ध नसल्याने वयोवृद्ध प्रवासी यांचे हाल होत आहेत.दरम्यान नेरळ स्थानकात फलाट 1 वर मुंबई दिशेकडे उभारण्यात आलेला सरकता जिना लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असून रेल्वे प्रशासन कोणाची वाट पाहत आहे असा सवाल नेरळ प्रवासी संघटना यांनी उपस्थित केला आहे.
मध्य रेल्वे वरील नेरळ जंक्शन स्थानकाचा मेकओव्हर मुंबई रेल कॉर्पोरेशन कडून सुरू आहे.मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून नेरळ स्थानकात अनेक विकास कामे सुरू आहेत.त्यात मुंबई कडून उपनगरीय लोकल येत असलेल्या प्लॅटफॉर्म1 वर मुंबईच्या दिशेने सरकता जिना प्रवासी वर्गासाठी सोयीसाठी उभारण्यात आला आहे.या सरकता जिन्यावर एकाच वेळी प्रवासी वर्गाला स्थानकात उतरण्याची आणि स्थानकातून वर जाण्याची सुविधा आहे.मोठ्या प्रमाणावर पर्यटक नेरळ स्थानकातून माथेरान या पर्यटन स्थळी जाण्यासाठी येत असतात. त्यामुळे नेरळ स्थानकात सरकता जिना यापूर्वी होणे आवश्यक होते.मात्र आता हा सरकता जिना बांधून तयार आहे,परंतु तो सरकता जिना अद्याप कार्यान्वित झालेला नाही.दुसरीकडे नेरळ स्थानकात मोठे संख्येने येणारे पर्यटक यांच्यात वयोवृद्ध पर्यटक अधिक संख्येने असतात आणि त्यांना सरकता जिना नसल्याने गैरसोयी ला सामोरे जावे लागते.ही बाब लक्षात घेऊन सरकता जिना उभारण्याची मागणी सातत्याने होत असते.
मात्र त्याचवेळी नेरळ स्थानकाच्या मध्यभागी मुंबई रेल कॉर्पोरेशन कडून सरकता जिना उभारला जात आहे.या सरकता जिन्याच्या उभारणीचे काम अत्यंत कासवगतीने सुरू असून त्याबाबत नेरळ प्रवासी संघटना यांनी नाराजी व्यक्त केली आहे.नेरळ सारख्या लोकसंख्या वाढीचा वेग प्रचंड असलेल्या मुंबईचे उप नगर म्हणून विकसित होत असलेल्या रेल्वे स्थानकात सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याने प्रवासी संघटना नाराज आहे.त्यामुळे मुंबई रेल कॉर्पोरेशन कडून सुरू असलेल्या या कामाबद्दल मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पुढाकार घ्यावा आणि स्थानकात सुरू असलेली विकास कामे तातडीने मार्गी लावावी अशी मागणी नेरळ प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संदीप म्हसकर तसेच राजेश गायकवाड,मिलिंद विरले, आबासाहेब पवार,प्रभाकर देशमुख,आदी पदाधिकारी यांनी केली आहे.