वडगाव मावळ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचा गैरफायद घेऊन त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या घटनेने शिवसैनिकांसह राज्यातील जनतेला दुःख झाले आहे. त्यामुळे या बंडखोर आमदार आणि खासदारांना शिवसैनिकांसह सर्वसामान्य जनतेचा तळतळाट लागल्याशिवाय राहाणार नाही. निष्ठावंत शिवसैनिकांच्या जीवावर निवडून आलेले आमदार, खासदार पुन्हा निवडून येणार नाहीत. त्यांनी पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान शिवसेना महिला आघाडी मावळ तालुका संपर्क संघटिका लतिका पाष्टे यांनी केले. तसेच बैठक बोलावली असतानाही मोठ्या संख्येने शिवसैनिकांची उपस्थिती लावल्याने या बैठकीला मेळाव्याचे स्वरूप आले, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
मावळ तालुका निष्ठावंत शिवसैनिकांची आढावा बैठक वडगाव मावळ येथील द्वारकाधीश मंगल कार्यालयात सोमवारी (दि. २५ ) घेण्यात आली. त्यावेळी लतिका पाष्टे यांनी शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या आमदार, खासदारांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. या बैठकीला शिवसेनेचे भारत ठाकूर, शांताराम भोते, अनिकेत घुले, शादान चौधरी, रमेश जाधव, अनिल ओव्हाळ, मदन शेडगे, अमित कुंभार, राहुल नखाते, राम सावंत, विकेश मुथा, शैला खंडागळे, भरत नायडू, विशाल दांगट, देवा कांबळे, मेहरबान सिंग आदींसह मावळातील अनेक शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.
[blockquote content=”आमदार, खासदार शिवसेना सोडून गेले. अशा फुटारांच्या जीवावर शिवसेना कधीच नव्हती आणि यापुढेही राहणार नाही. उलट आता नव्या जोमाच्या शिवसैनिकांना महत्वाच्या जबाबदाऱ्या मिळतील. पक्ष वाढ आणि जनतेची कामे करून आम्ही पुन्हा आमदार, खासदार निवडून आणून दाखवू. ” pic=”” name=”-अनिकेत घुले, जिल्हाधिकारी, युवा सेना.”]
[blockquote content=”देहूरोडमध्ये १९९७६ला शिवसेनेची स्थापना झाली. त्यावेळी अनेक संकटांचा सामना करून शिवसैनिकांनी १९९२ला देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डावर भगवा फडकावला. शिवसेनेचे स्थानिक नेते, शिवसैनिकांच्या हत्या झाल्या तरी शिवसैनिक खचला नाही. उलट नव्या ताकदीने आम्ही आजही शिवसेनेचे काम करीत आहोत. बंडखोरीचा आम्हाला काहीही फरक पडणार नाही. ” pic=”” name=”-रमेश जाधव, तालुका समन्वयक शिवसेना.”]
[blockquote content=”बंडखोरीचा मावळ शिवसेनेला कोणताही फरक पडणार नाही. तालुक्यात निष्ठावंत शिवसैनिक शिवसेनेसोबत कायम आहेत. आजची निष्ठावंतांची गर्दी पाहून शिवसेनेला धक्का बसला नसल्याचे स्पष्ट होते. मावळची शिवसेना कायम मातोश्रीसोबाबत एकनिष्ठ आहे. विजय तिकोने, तालुका अधिकाऱी, युवा सेना.” pic=”” name=”विजय तिकोने, तालुका अधिकाऱी, युवा सेना.”]
ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार
मावळ तालुक्यातील काही पदाधिकारी शिंदे गटात गेल्याने शिवसेनेला कोणताही धक्का बसला नाही. या उलट बैठकीची गर्दी पाहता मावळ शिवसेनेला नवी संजीवनी मिळाली. या पुढे कोणीही पक्ष सोडून जाणार नाही. गेले ते कावळे, राहिले ते मावळे. आमच्या हातात शिवबंधन, पुन्हा शिवसेना उभी करू, असा शब्द शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर तीव्र नाराजी व्यक्त करून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.