कणकवली : नारायण राणे यांच्या उमेदवारीची पात्रता ठरविण्यासाठी महायुतीला आणि भाजपला एवढा वेळ लागलेला आहे की त्यांची उमेदवारी आज 13 व्या यादीमध्ये प्रसिद्ध झाली. म्हणजेच पहिल्या बेंचवर बसत असल्याचे सांगणारा उमेदवार शेवटच्या बेंचवर बसून हट्टाने उमेदवारी मिळवली. खरंतर त्यांच्यासमोर किरण सामंत सारखे नवखे उमेदवार असताना किरण सामंत यांनी त्यांच्यावर 13 व्या यादीत नाव घोषित करण्याची वेळ आणली ही नामुष्की आहे अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
आमदार वैभव नाईक म्हणाले, राणे यांची पात्रता भाजपमध्ये केवढी आहे. महायुतीमध्ये केवढी आहे हे आता जनतेने ओळखले असून उमेदवाराची पात्रता जर भाजपमध्ये नसेल तर ती लोकांमध्ये कशी असेल असा सवाल वैभव नाईक यांनी केला आहे. विनायक राऊत हे या मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. राणे यांनी ही हट्टाने उमेदवारी घेतली आहे. त्यांच्या दोन मुलांच्या राजकीय करिअरसाठी ही उमेदवारी त्यांनी स्वीकारली आहे. आणि या निमित्ताने राणे हे स्वतःसाठी आणि त्यांच्या दोन मुलांसाठी काम करत आहेत हे आता सिद्ध झाले आहे.
पुढे वैभव नाईक म्हणाले की, जर किरण सामंत यांना त्यांनी पाठिंबा दिला असता तर लोकांनी म्हटले असते की राणे हे इतरांसाठी काम करतात. मात्र त्यांनी स्वतःसाठी उमेदवारी घेऊन आम्ही गेली दहा वर्षे जो दावा करीत आहोत तो खरा झाला आहे. प्रत्येक गोष्टीसाठी राणेच उमेदवार का असा आमचा सवाल आहे असेही आमदार वैभव नाईक म्हणाले.






