अमरावती : नागपुरी गेट परिसरातील मेहबूब नगरात अब्दुल मजीद अब्दूल अजीज ठेकेदारच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेले आरोपी रियाज खान हाफिज खान (२५, जामिया नगर) आणि फिरोज बाली जहीर बाली (२४, नूर नगर) या दोघांना न्यायालयात हजर करीत ६ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत घेतले आहे. तर तिसरा आरोपी शब्बीर शहा (मेहबूब नगर) फरार आहे. त्याचा पोलिसांकडून शोध घेतल्या जात आहे.
जखमी अवस्थेत फेकले होते इर्वीन जवळ
२७ जूनच्या रात्री नाली सफाईतून झालेल्या वादातून तिघांनी अब्दूल मजीद सोबत भांडण झाले होते. रात्री उशिरा त्याच्या घराचा दरवाजा वाजविला होता. बाहेर येताच तिघांनी त्याच्यावर चाकूने वार केले. त्याला फरफटत नेत दुचाकीवर बसविले. त्यानंतर इर्विन च्या बाहेर त्याला जखमी अवस्थेत फेकून दिले होते. घटनेनंतर तिनही आरोपी फरार होते.
शनिवारी रात्री पोलिसांनी फिरोज बाली याला पकडले. त्यानंतर रियाज खान याला ताब्यात घेतले. अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींनी नालीच्या वादातून अब्दूल मजीद व आरोपी शब्बीर शहा यांच्या दरम्यान भांडण झाल्याचे सांगितले. शब्बीर शहाच्या सांगण्यावरून अब्दुल मजीदला मारण्याकरिता घटनास्थळी गेले होते. तिघांनी मिळून चाकूचे वार करीत त्याची हत्या केल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केले असता ६ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.






