चिपळूण : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक महायुती म्हणून लढणार असून, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांनी रत्नागिरी-रायगड लोकसभा मतदारसंघ चिपळूण तालुक्यातील समाविष्ट गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या खरवते येथील संवाद मेळावा प्रसंगी केले.
यावेळी माजी पंचायत समिती सभापती पुजा निकम यांची महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्षापदी निवड केल्याचे पत्र देण्यात आले. यावेळी आमदार शेखर निकम, जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
लोकसभा मतदारसंघ खासदार सुनील तटकरे व आमदार शेखर निकम यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, विरोधक आपण सत्तेसाठी व केंद्रीय यंत्रणेच्या बचावासाठी सत्तेत सहभागी झाल्याचा आभास निर्माण करत आहेत. मात्र, राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली हा घेतलेला निर्णय कोणत्याही यंत्रणेच्या भीतीपोटी नसून लोकशाहीच्या सिद्धांतावर विश्वास ठेवून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी व राज्याच्या विकासासाठी हा निर्णय घेतला आहे.