कास पठार / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सातारा शहराची तहान भागविणाऱ्या कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस कमालीची घट होत असून, पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर खालावू लागली आहे.
गतवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कास तलावाचा दुसरा व्हॉल्व्ह बंद करण्यात आला होता. त्यानंतर अंतिम तिसऱ्या व्हॉल्व्हद्वारे कासचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. सध्या मागील महिन्यापासुन जुना व्हॉल्व्ह ऑपरेट न करता सध्या नवीनलाईन सुरू केल्याने शेवटपर्यंतचा एकच नवीन व्हॉल्व्ह सुरू राहणार आहे.
सद्यस्थितीला तलावात केवळ साडेआठ फुट एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साडेसात फुट पाणीसाठा तलावात शिल्लक होता. दोनवेळा झालेल्या अवकाळी पावसाने कास तलावाच्या पाणीपातळीत दोन ते तीन इंच वाढ झाली होती. परिसरात उन्हाची तीव्रता देखील जास्त आहे. वरूणराजा वेळेत बरसला नाही तर सातारकरांची तहान भागविणे जिकिरीचे होणार आहे.
शहराला होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे दर दिवसाला तलावातील पाणीपातळी सव्वा ते दिड इंचाने कमी होत आहे. तलावातील पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर घट होत असून काही ठिकाणी पात्रातील जमिनी देखील उघडया पडल्याचे चित्र दिसत आहे. दिवसभर वातावरणात उष्णता अधिक तीव्रतेने भासत असून, दिवसेंदिवस पाणी पातळी खालावतच चालली आहे.
सध्या कास तलावात साडेआठ फुट पाणीसाठा शिल्लक असुन गतवर्षीच्या तुलनेत यंदा एका फुटाने पाणीसाठा जरी जास्त असला तरी नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करणे आवश्यक आहे.
– जयराम किर्दत, पाटकरी, कास तलाव.