अकरावी प्रवेशाचे संकेतस्थळ ठप्प (Pic credit : social media)
मुंबई : अकरावी प्रवेशाच्या प्रत्यक्ष अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला बुधवारी सकाळी सुरुवात झाली. परंतु, बुधवारी संकेतस्थळच बंद असल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरता आले नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना मानसिक त्रास सहन करावा लागला. दहावीचा निकाल 13 मे रोजी जाहीर झाल्यानंतर शिक्षण संचालनालयाने तातडीने ऑनलाईन अकरावी प्रवेश परीक्षा सुरू केली.
19 व 20 मे रोजी विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करण्यात आल्यानंतर 21 मेपासून प्रत्यक्ष ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र, अकरावी प्रवेशाचे संकेतस्थळ बुधवारी सकाळपासूनच बंद असल्याने विद्यार्थी व पालकांना अर्ज भरण्यात अडचणींचा सामना करावा लागला. सकाळपासून सायबर कॅफे किंवा घरातील संगणकासमोर बसलेल्या विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. संकेतस्थळावर देण्यात आलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर पालक व विद्यार्थ्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना कोणतेही उत्तर मिळाले नाही.
दरम्यान, मुंबई, पुणे-पिपरी चिंचवड महापालिका, छत्रपती संभाजीनगर महापालिका, नाशिक महापालिका येथे ठराविक महानगरपालिकांमध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत होती. या प्रवेश प्रक्रियेदरम्यान शिक्षण संचालनालयाचा प्रवेश प्रक्रियेत दरवर्षी गोंधळ उडत असे. त्यामुळे राज्यभरातील प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडण्याबाबत शिक्षण तज्ज्ञांकडून शंका उपस्थित करण्यात येत होती.
पहिल्याच दिवशी रास्त ठरविण्यात आली. अकरावी प्रवेशाचे वेबपोर्टल मोबाईलद्वारे हाताळताना अधिक सुलभ व्हावे, यासाठी काही वेळासाठी पोर्टलची सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. विद्यार्थी आणि पालकांनी गोंधळून जाऊ नये. संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेच्या अपडेट देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या व्हॉट्सअप चॅनेलवर आपल्याला लगेच माहिती देण्यात येईल. विद्यार्थी नोंदणी आणि पसंतीक्रम भरण्याची सुविधा पहिल्या फेरीसाठी २८ मेपर्यंत सुरू राहणार असल्याचे शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट केले आहे.