संग्रहित फोटो
पंधरा दिवसांपुर्वी महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी जाहीर झाली. या मतदार यादीत तीन लाखाहून अधिक मतदारांची नावे दुबार आहेत. या दुबार नावांचे काय करावे असा प्रश्न महापालिकेला पडला आहे. ही नावे वगळणे आवश्यक आहे, त्यापार्श्वभुमीवर राज्य निवडणुक आयाेगाच्या आढावा बैठकीत पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशाेर राम यांनी प्रश्न उपस्थित केला. पुण्यात तीन लाखाहून अधिक नावे दुबार आहेत, तर काही नागरीकांनी, लाेकप्रतिनिधींनी दुबार नावे शाेधून काढली आहेत. त्यामुळे दुबार नावे असलेल्या मतदारांची संख्या अधिक असू शकते. या नावांचे काय करायचे याविषयी मार्गदर्शन करावे, अशी विनंती आयुक्त नवल किशाेर राम यांनी आयाेगाकडे केली.
राज्यातील इतर महापालिकांच्या मतदार यादींविषयी आलेल्या तक्रारींची दखल घेता, पुण्यातील स्थिती समाधानकारक असल्याचे आयुक्त नवल किशाेर राम यांनी पत्रकारांना सांगितले. इतर महापालिकांत एक लाखाहून अधिक हरकती नाेंदविल्या गेल्या आहेत. लाेकसंख्या, मतदारसंख्येचा विचार करता, पुण्यात स्थिती समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले. या दुबार मतदारांनी दाेन वेळा मतदान करू नये अशी अपेक्षा आहे, त्यासंदर्भात आवाहन करावे लागेल. तसेच प्रत्यक्ष सर्वेक्षण करावे लागणार आहे. याद्या तयार करण्याचे काम महापालिका करीत नाही, निवडणूक आयाेगाकडून आलेल्या मतदार याद्यांचा उपयाेग करावा लागताे. काेणाचेही नाव घालणे किंवा वगळण्याचा अधिकार महापालिकेला नाही. काही मतदारांची नावे आहे, परंतु पत्ता नाही अशा ठिकाणी ब्लाॅक निहाय यादीत ही नावे ठेवली जातील.
बारा हजाराहून अधिक हरकतींवर दुरुस्ती !
महापालिकेच्या प्रारुप मतदार यादींवर सुमारे बावीस हजाराहून अधिक हरकती आल्या आहेत. महापालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही सुरु केली आहे. आजपर्यंत बारा हजाराहून अधिक हरकतीनुसार यादी दुरुस्त केल्या आहेत. उर्वरीत हरकतींवरील कार्यवाही ७ डिसेंबरपर्यंत पुर्ण केल्या जातील. याद्यांमध्ये त्रुटी राहणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली जात आहे, असा दावाही आयुक्त नवल किशाेर राम यांनी केला आहे.






