संग्रहित फोटो
पिंपरी : मोहननगर, चिंचवड परिसरात लग्नाच्या तयारीच्या वातावरणात काळाने घाला घालत ५२ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. पाण्याच्या टाकीत बुडून आशा संजय गवळी (वय ५२, रा. मोहननगर, चिंचवड) यांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या मुलाचा विवाह येत्या ४ नोव्हेंबर रोजी होणार होता. आनंदाच्या क्षणी अचानक आलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गवळी कुटुंबात लग्नाचा आनंद, पाहुण्यांची ये-जा, खरेदीची लगबग सुरू होती. शुक्रवारी घरात ‘सुवासिनींचे जेवण’ आयोजित करण्यात आले होते. स्वयंपाकाच्या तयारीदरम्यान घरात पाण्याची टंचाई जाणवल्याने आशा गवळी या सोसायटीच्या वाहनतळातील जमिनीखालच्या टाकीतून पाणी काढण्यासाठी गेल्या. पाण्याची बादली टाकताना तोल गेल्याने त्या टाकीत पडल्या.
थोड्याच वेळात त्या दिसेनाशा झाल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता, टाकीचे झाकण उघडे दिसले. मुलाने आत पाहिले असता आई पाण्यात बुडालेली दिसली. तत्काळ त्यांना बाहेर काढून जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आले, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे लग्नाचे वातावरण शोकाकुल झाले असून, गवळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.






