संग्रहित फोटो
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागा वाटपाचे सुत्र जमले नाही. या गाेंधळाच्या परीस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेकडून माेठ्या संख्येने अर्ज वाटप केले गेले. या पार्श्वभुमीवर भाजपने अजुनही शिवसेनेला १६ जागा देण्याची तयारी दाखविली आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ यांनी शिवसेनेशी युती हाेईल असा विश्वास पत्रकार परीषदेत केला आहे. या परीषदेत त्यांनी स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये जागांबाबत एकमत झाले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीबाबत निर्णय घेतील असे स्पष्ट केले. वास्तविक शिंदेंच्या शिवसेनेकडेे आता एकच नगरसेवक असताना त्यांनी जास्त जागा मागणे व्यवहार्य वाटले नाही, असे माेहाेळ यांनी नमूद केले.
भाजपकडून पहील्या दिवसापासून शिंदेंच्या शिवसेनेबराेबर युती हाेईल असा दावा केला. प्रत्यक्षात १६५ म्हणजे सर्वच जागांवर त्यांनी उमेदवार उभे केले आहेत. तर शिंदेच्या शिवसेनेने तब्बल २६ प्रभागांमध्ये शंभरहून अधिक उमेदवार उभे करून भाजपसमोर थेट राजकीय आव्हान उभे केले आहे. त्यामुळे युतीचा अंतिम निर्णय झाला, तरी मोठ्या प्रमाणावर दिलेले एबी फॉर्म आणि भरलेले उमेदवारी अर्ज माघारी घेणे हे दोन्ही पक्षांसाठी मोठे संकट ठरणार आहे.
उमेदवारी नाकारल्यामुळे भाजपमध्ये माेठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त हाेत आहे. त्यातच आता शिवसेनेला जागा साेडण्यासाठी आपल्याच उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यास सांगण्याचे धाडस त्यांना करावे लागणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेने ४० ते ४५ जागांची मागणी केली, तर भाजपने सुरुवातीला मर्यादित जागांचीच तयारी दर्शविली. पुढे झालेल्या चर्चेत १६ जागा देण्याची तयारी भाजपने दाखविली हाेती. परंतु भाजपसाेबत जाण्यावरून शिंदेंच्या शिवसेनेत स्थानिक पातळीवर एकमत झाले नाही. शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी देखील पक्षाच्या बैठकीतून काढता पाय घेतला हाेता.
माघारीचा निर्णय अशक्यच
शिंदेच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद वाढत गेला, शेवटी शिवसेनेनेही मोठ्या संख्येने एबी फॉर्म देत उमेदवार मैदानात उतरवले. दाेन्ही पक्षांच्या नेत्यांनी युती करण्याचा निर्णय घेतला तर भाजपला जेमतेम १५ ते २० जागांवरील उमेदवार माघारी घ्यावे लागतील, तर शिवसेनेसमोर ८० हून अधिक उमेदवारांचे अर्ज मागे घेण्याचे आव्हान उभे आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपत आहे. यामुळे एवढ्या कमी वेळेत युतीचा आणि माघारीचा निर्णय हाेण्याची चिन्हे दिसत नाही.
शिवसेनेने उमेदवार उभे केलेले प्रभाग
प्रभाग क्र. 1, 3, 5, 6, 10, 11, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 24, 30, 32, 33, 34, 36, 37, 38, 39, 40, 41






