राजकीय नेत्यांच्या सातत्याने पक्ष बदलण्यामुळे विश्वासहार्तवर आणि विचारसरणीवर प्रश्न निर्माण झाला आहे (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : आकाश ढुमेपाटील : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारणाचा पट वेगाने बदलत असताना आयाराम–गयाराम ही संज्ञा पुन्हा केंद्रस्थानी आली आहे. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात होणाऱ्या सततच्या उड्या ही केवळ व्यक्तीगत संधीसाधूपणाची गोष्ट राहिलेली नाही. ती आता पक्षीय राजकारणाच्या रचनेवर, कार्यकर्त्यांच्या मनोबलावर आणि मतदारांच्या विश्वासावर थेट परिणाम करणारी बाब ठरत आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, पक्षांतरांचे प्रमाण वाढण्यामागे तीन प्रमुख कारणे आहेत. यामध्ये एक म्हणजे उमेदवारी मिळवण्याची घाई, दुसरी सत्तेच्या जवळ राहण्याची मानसिकता आणि आणि तिसरे कारण म्हणजे स्थानिक पातळीवरील अंतर्गत गटबाजी. पुण्यासारख्या शहरात प्रभागनिहाय राजकारण हे कार्यकर्त्यांच्या जाळ्यावर उभे असते. मात्र, वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून आयत्या वेळी आलेल्यांना संधी दिली जात असल्याने हा पाया ढासळताना दिसतो आहे.
हे देखील वाचा : फडणवीसांविरोधात ते वक्तव्य भोवलं! भाजप उमेदवार पूजा मोरेंची निवडणुकीतून रडत रडत माघार
भारतीय जनता पार्टी, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सर्वच प्रमुख पक्षांना या प्रवृत्तीचा फटका बसत असल्याचे चित्र आहे. पक्षांतर करून आलेल्या उमेदवाराकडे “जिंकण्याची क्षमता आहे” असा युक्तिवाद केला जातो. परंतु स्थानिक पातळीवर तो कितपत स्वीकारला जातो, याचा गांभीर्याने विचार केला जात नाही. परिणामी, प्रचाराच्या काळात कार्यकर्त्यांचा उत्साह कमी होतो, बूथ व्यवस्थापन कमकुवत होते आणि पक्षाची संघटनात्मक ताकद कमी होते.
मतदारांच्या मनोवृत्तीचाही येथे विचार करणे आवश्यक आहे. शहरी मतदार हा अधिक जागरूक आणि प्रश्न विचारणारा असतो. वारंवार पक्ष बदलणाऱ्या उमेदवाराबाबत “हा उद्या पुन्हा रंग बदलेल” अशी शंका मतदारांच्या मनात निर्माण होते. याचा परिणाम क्रॉस व्होटिंग, नोटा किंवा मतदानातील उदासीनता अशा स्वरूपात दिसून येऊ शकतो. हे सर्व घटक कोणत्याही पक्षासाठी धोक्याची घंटा ठरू शकतात.
हे देखील वाचा : मुंबईचा महापौर मराठी होणार की अमराठी? रंगलं राजकारण; नितेश राणेंनी केलं खास ट्वीट
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजकीय मूल्यांचा ऱ्हास. विचारधारा, पक्षनिष्ठा आणि कार्यक्रम याऐवजी वैयक्तिक गणिते आणि तात्कालिक लाभ केंद्रस्थानी आले, तर राजकारणावरचा जनतेचा विश्वास कमी होतो. पुणे महापालिकेसारख्या महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत हा विश्वास टिकवणे अत्यावश्यक आहे; कारण शहराच्या विकासाचा थेट संबंध स्थिर आणि विश्वासार्ह नेतृत्वाशी जोडलेला असतो.
विश्लेषकांच्या मते, यंदाच्या निवडणुकीत आयाराम–गयाराम संस्कृतीचा तात्पुरता फायदा काही प्रभागांत दिसला, तरी एकूणच सर्व पक्षांना त्याची किंमत मोजावी लागू शकते. निष्ठावान कार्यकर्ते दुखावले गेले, तर पक्षयंत्रणा आतून कमकुवत होते; आणि मतदार नाराज झाला, तर त्याचा निकाल थेट मतपेटीतून समोर येतो. त्यामुळे ही निवडणूक केवळ उमेदवारांची नाही, तर पक्षांच्या विश्वासार्हतेची आणि निष्ठेच्या राजकारणाची कसोटी ठरण्याची दाट शक्यता आहे.






